छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सध्या कलाविश्वात शोककळा पसरली असून त्यांच्या सारखी गुणी अभिनेत्री गमावल्याचं दु:ख चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे रिटा यांच्या निधनामुळे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुही परमार हिला प्रचंड धक्का बसला असून तिची एक इच्छा अपूर्ण राहिल्याचं नुकतंच तिने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिटा भादुरी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना मूत्रपिंडाची समस्या असल्यामुळे डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. मात्र एवढ्या आरोग्याशी निगडीत समस्या असतानाही त्या नियमित शूटिंगला जात होत्या आणि शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेत सेटवरच आराम करत होत्या. विशेष म्हणजे त्या प्रत्येक मालिका, चित्रपटांच्या सेटवर मनमोकळेपणाने वावरत होत्या. त्यांच्या याच स्वभावामुळे  जुही परमार आणि रिटा यांची मैत्री झाली होती.

‘कुमकुम-प्यारा सा बंधन’ या मालिकेमध्ये रिटा भादुरी आणि जुही परमार यांनी स्क्रिन शेअर केली होती. या मालिकेच्या सेटवर या दोघींची चांगलीच गट्टीही जमली होती. या दोघी मालिका संपल्यानंतरही एकमेकींच्या संपर्कामध्ये होत्या. त्यामुळे जुही कायम रिटा यांनी ‘रिटा मा’ या नावाने हाक मारत असे. मध्यंतरी जुही तिच्या कामानिमित्त मुंबईबाहेर होती. त्यामुळे मुंबईमध्ये परतल्यानंतर प्रथम रिटा यांची भेट घ्यायची असं जुहीने ठरवलं होतं.

दरम्यान, जुही मुंबईत परतण्यापूर्वीच तिला रिटा यांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यामुळे रिटा यांची अखेरची भेटदेखील घेता न आल्यामुळे जुहीला प्रचंड धक्का बसला आहे. याविषयी खंत वाटत असल्याचंही तिने बोलून दाखविलं. ‘रिटा यांना मी कायम ‘रिटा मा’ याच नावाने हाक मारत होते. त्यामुळे त्यांचं असं अचानक सोडून जाणं मला पटलेलं नाही. मी ते सहन करुच शकत नाही. त्या खूप प्रेमळ होत्या. त्यांना या जन्मात विसरणं शक्यच नाही’. असं जुहीने सांगितलं.

रिटा यांनी छोट्या पडद्यावरील ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘अमानत’, ‘एक नई पहचान’, ‘बायबल की कहानियाँ’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तर ‘सावन को आने दो’, ‘राजा’, ‘विरासत’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juhi parmar remember her rita ma
First published on: 17-07-2018 at 17:27 IST