भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या ‘काली’ या माहितीपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. नुकतंच या माहितीपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं मात्र कालीमातेचा अपमान या माहितीपटाच्या पोस्टरमधून करण्यात आला दावा अनेकांनी केलाय. ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. लिना यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लीना यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर जोरदार टीका होऊ लागली होती. या पोस्टरवर हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. यावरून अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत टीका केली आहे. एवढंच नाही तर निर्मात्या व दिग्दर्शक लीना मणीमेकल यांच्या अटकेची मागणी केली जात होती.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा- Kaali पोस्टर वादावर दिग्दर्शक लिना मणीमेकल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “मी कोणालाही…”

आता उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये लीना मणीमेकल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून यासंबंधी ट्वीट करण्यात आलं आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकल यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून शांततेचा भंग करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.

याशिवाय दिल्लीमध्येही लीना मणीमेकल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने ‘काली’ माहितीपटाशी संबंधित एका वादग्रस्त पोस्टरबद्दल निर्मात्यांवर IPC कलम १५३ अ आणि २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लिना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. लिना मणीमेकल यांना अटक करा अशा अर्थाचा ‘#ArrestLeenaManimekal’ हा हॅटशॅग अनेकांनी वापरला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर लीना मणीमेकल यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एक ट्वीट करत या वादावर आपली बाजू स्पष्ट केली होती.

काय म्हणाल्या लीना मणीमेकल?
लीना मणीमेकल यांनी लिहिलं, “माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. जी माणसं कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा असतो. मी कोणालाही घाबरत नाही आणि याची किंमत जर माझं आयुष्य असेल तर मी तेही द्यायला तयार आहे. हा चित्रपट एका अशा घटनेची कथा आहे ज्यात एका संध्याकाळी कालीमाता प्रकट होते आणि टोरंटोच्या रस्त्यांवरून फिरू लागते. जेव्हा तुम्ही हा माहितीपट पाहाल तेव्हा मला अटक करण्याचे हॅशटॅग न वापरता मला प्रेम द्याल.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaali poster row fir against leena manimekal in uttar pradesh and delhi mrj
First published on: 05-07-2022 at 14:16 IST