अभिनेता कमल हासन गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कर्नाटकातील अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. अशातच आता कमल हासन यांनी हिंदी भाषेबद्दलही स्पष्ट मत मांडलं आहे, ज्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहेत.
कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कमल हासन यांनी दक्षिणेमधील हिंदीच्या सक्तीबद्दल मत मांडलं आहे. ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी यावरील त्यांचं मत स्पष्ट व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “आम्ही हिंदी शिकू, पण हिंदीची आमच्यावर सक्ती करू नका, हिंदी आमच्यावर लादू नका; कारण हे शिक्षण आहे आणि आपण शिक्षणाचा सर्वात सोपा मार्ग स्वीकारला पाहिजे, त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण करू नका.”
हिंदीच्या सक्तीबद्दल बोलताना कमल हासन पुढे म्हणाले, “हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करणारे आम्ही एकटे नाही आहोत, त्यामुळे मी पंजाब, कर्नाटका व आंध्र प्रदेश या राज्यांबरोबर सहमत आहे.” कमल हासन यांच्यासह तामिळनाडूमधील सत्तेत असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या पक्षानेसुद्धा राष्ट्रीय शिक्षण धोरणा (एनईपी) अंतर्गत आणलेल्या त्रिभाषा धोरणाला विरोध केला आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा)च्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पक्षाने वारंवार केला आहे, परंतु केंद्राने हा आरोप फेटाळून लावला आहे.
कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट ५ जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ‘ठग लाईफ’च्या म्युझिक लाँचच्या कार्यक्रमामध्ये कमल हासन यांनी “कन्नड भाषेबद्दल कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाला आहे” असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावर कर्नाटकातील लोकांकडून आक्षेप घेण्यात आला; तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने (केएफसीसी) जोवर कमल हासन माफी मागत नाही, तोपर्यंत ‘ठग लाईफ’ कर्नाटकामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही असं म्हटलं होतं. परंतु, कमल हासन यांनी अद्याप माफी मागितलेली नाही.
दरम्यान, कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट ५ जूनला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने देशभरात ३० कोटींची कमाई केली. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम दिग्दर्शित ‘ठग लाईफ’ या चित्रपटात कमल हासन यांच्यासह अभिनेत्री त्रिशा कृष्णन व अभिनेते महेश मांजरेकरही पाहायला मिळत आहेत.