अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत सतत चर्चेत येत आहे. सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे, असं म्हणत कंगनाने कलाविश्वातील अनेकांवर ताशेरे ओढले होते. यात तिने बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाही,मक्तेदारी या अनेक गोष्टींवरदेखील भाष्य केलं. तसंच तिला आलेले अनुभवदेखील शेअर केले. यातच आता मलादेखील जबरदस्तीने ड्रग्स दिले जात होत असं म्हटलं आहे.

“जेव्हा मी अल्पवयीन होते तेव्हा माझे मेंटॉर प्रचंड वेगळे वागत होते. मी पोलिसांकडे जाऊ नये यासाठी ते कायम माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळून देत होते. जेव्हा मी एक यशस्वी अभिनेत्री झाले आणि बॉलिवूडमधील पार्टीजमध्ये जाऊ लागले. त्यावेळी मला येथील भयावह जग, ड्रग्स आणि अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला”, असं कंगना म्हणाली.


पुढे ती म्हणते, “मी नार्कोटिक्स ब्युरोची मदत करण्यासदेखील तयार आहे. परंतु, त्यापूर्वी मला केंद्र सरकारकडून सुरक्षा हवी आहे. कारण यात मी केवळ माझं करिअरच नाही तर माझं आयुष्यदेखील पणाला लावत आहे. तसंच हे नक्की आहे की सुशांतला काही गुपितं माहिती होती, त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली आहे”.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यातच कंगनाने अनेकांवर टीकास्त्र डागलं आहे. यात तिने महेश भट्ट, करण जोहर यासारख्या अनेक दिग्गजांवर ताशेरे ओढले आहेत.