बॉलीवूडमधील छुपी प्रेमप्रकरणे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात सध्या सुरू असलेल्या लढाईमुळे बॉलीवूडजनही चक्रावले नसतील तरच नवल. ह्रतिकचे नाव न घेता आपल्या आयुष्यात तो जोडीदार म्हणून येणार असल्याचा दावा कंगनाने पहिल्यांदा केला होता. तेव्हापासून कंगना आणि हृतिक यांच्या कथित प्रेमप्रकरणाबद्दल बाहेर पडणाऱ्या एकेक गोष्टी सगळ्यांनाच धक्के देणाऱ्या ठरल्या आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा कंगनाने ह्रतिकवर निशाणा साधला आहे.
तु एका दिवसासाठी ह्रतिक रोशन झालीस तर काय करशील? असा प्रश्न कंगनाला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता “मी सर्वात प्रथम कंगनाची माफी मागेन” असे उत्तर तिने दिले. “आमच्यात जे काही झाले ते पाहाता ह्रतिकने माझी माफी मागायला हवी. त्यामुळे जर मी ह्रतिक झाले तर सकाळी उठल्यावर सर्वात आधी कंगनाला फोन करेन आणि हात जोडून तिची माफी मागेन” असे कंगना राणावत म्हणाली.
या पूर्वीही एका कार्यक्रमात कंगनाने ‘माजी प्रियकर मूर्खपणाचे उद्योग करत असतात’, अशा शब्दांत ह्रतिकची जाहीर निर्भर्त्सना केली होती. त्या प्रकरणावरून ह्रतिकने तिच्या मागे जाहीर माफी मागण्याचा धोशा लावला. पाठोपाठ आपल्या ई-मेल आयडीवरून भलताच कोणीतरी ह्रतिक रोशन म्हणून चाहत्यांशी संवाद साधत असल्याची तक्रार करत हृतिकचे हे प्रकरण सायबर सेलकडे पोहोचले. मात्र तिथून आत्तापर्यंत हे प्रकरण धसास लागण्यापेक्षा एकमेकांना कायदेशीर नोटीस, आरोप-प्रत्यारोप करत चिघळतच गेले आहे.