‘क्वीन’ चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू

‘क्वीन’ या चित्रपटाला विविध पुरस्कार मिळाले होते.

कंगना रणौत

‘क्वीन’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या अभिनयाद्वारे सिनेरसिकांना भुरळ घातली होती. या चित्रपटातील गाण्यांपासून ते अगदी कंगनाच्या अभिनयापर्यंत साऱ्याला रसिकांची दाद मिळाली होती. ‘क्वीन’ला मिळालेली लोकप्रियता पाहता या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा आहे. एका वेगळ्याच विषयावर आधारित ‘क्वीन’ या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच त्याच्या दुसऱ्या भागातही वेगळे कथानक हाताळले जाणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक विकास बहल आणि ‘फॅन्टम फिल्म्स’ सध्या ‘क्वीन’ च्या पुढच्या भागासाठी काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चित्रपटाची संहिता आणि इतर चर्चा पूर्णत्वास गेल्यानंतरच कंगनाला या चित्रपटाबाबतची विचारणा करण्यात येणार आहे. कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘क्वीन’ या चित्रपटाने चांगले प्रदर्शन करत १०० कोटींपेक्षाही जास्तीची कमाई केली होती. ‘क्वीन’ला विविध पुरस्कारही मिळाले होते. एका दिलखुलास आणि चौकटीपलीकडे जाणाऱ्या मुलीचे पात्र कंगनाने या चित्रपटामध्ये साकारले होते. कंगनाने साकारलेल्या या भूमिकेसाठी तिच्यावरही विविध पुरस्कारांची बरसात झाली होती. ‘क्वीन’ कंगनाची प्रेक्षकांवर असणारी भुरळ पाहता या चित्रपटाच्या सिक्वलसाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दरम्यान सध्या कंगना तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असून तिच्या आणि अभिनेता हृतिक रोशनच्या नात्याविषयीसुद्धा अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये कंगनाने तिच्या आणि हृतिक रोशच्या नात्याविषयी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे भाष्य केले होते. राकेश रोशन यांना उद्देशून ‘प्रत्येकवेळी वडिलांना त्यांच्या मुलांच्या बचावासाठी पुढाकार घेण्याची काय गरज’, असा सवाल कंगनाने केला होता. इतकेच नाही तर यावेळी आपण अजूनही ‘सिंगल’ का आहोत याचे कारण कंगनाने सर्वांसमोर सांगितले होते. कंगना म्हणालेली की, इतर पुरुष आणि माझे ‘बॉयफ्रेण्ड्स’ माझ्या यशावर जळायचे. मी जसजशी यशस्वी होत गेले तसं त्यांना असुरक्षित वाटू लागलं. याचाच परिणाम आमच्या नात्यावर पडल्याने माझे ‘ब्रेकअप्स’ झाले, असे तिने सांगितले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kangana ranaut queen will have a sequel soon