बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला सिनेसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्यासाठी आलेल्या कंगना रणौतला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अनेकदा विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगनाचा आज (२३ मार्च) वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिने जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. याचे काही खास फोटो तिने शेअर केले आहे.
कंगनाने काही तासांपूर्वी तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. यात वाढदिवसानिमित्त ती खास जम्मू काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात पोहोचल्याचे दिसत आहे. कंगनासह तिची बहिण रंगोलीनेही वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. कंगनाने हे खास फोटो शेअर करत सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. यापूर्वीही कंगनाने अनेकदा वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे.
कंगनाने शेअर केलेल्या या फोटोत तिने छान कुर्ता आणि पंजाबी लेहंगा परिधान केल्याचे दिसत आहे. तिच्या पाठीमागे वैष्णोदेवी मातेचे मंदिर पाहायला मिळत आहे. या फोटोत ती फार सुंदर दिसत आहे. “आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज भगवती श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. देवीच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी आयुष्याच्या नव्या वर्षात पाऊल टाकत आहे. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
दरम्यान यासोबत कंगनाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर भैरो बाबांच्या दर्शन घेतल्याचे सांगितले आहे. यासोबत तिने या पोस्टमध्ये एक अख्यायिकाही सांगितली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यासोबत तिने अनेक फोटोही पोस्ट केले आहे.
बप्पी लहरींनी स्वतःच्या बायोपिकसाठी ‘या’ अभिनेत्याला दर्शवली होती पहिली पसंती
कंगना ही सध्या ‘लॉक अप’ या शोमध्ये काम करत आहे. यात ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी ‘लॉक अप’मध्ये बंद राहणार आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. त्यासोबत कंगना ही लवकरच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. कंगना रणौत ही सध्या टिकू वेड्स शेरु या चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त आहे. कंगना निर्मिती करत असलेल्या या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री अवनीत कौर स्क्रीन शेअर करणार आहे.