बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच कंगना रणौत. कंगना आज कंगना तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज कंगनाच्या वाढदिवसा निमित्ताने तिचा आगामी चित्रपट ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आता त्या पाठोपाठ कंगनाचा आगामी चित्रपट ‘तेजस’ मधील कंगनाचा लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे.

कंगनाचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आरएसव्हीपी मूव्हिजने कंगनाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत कंगनाने भारतीय वायू सेनेचा गणवेश परिधान केला आहे. तिच्या हातात पेन्सिल असून ती ट्रेनिंग रूममध्ये बसल्याचे दिसत आहे. कंगनाच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. “प्रिय तेजस, तुझे पंख पसरवत उंच भरारी घे, आज आणि नेहमीच. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कंगना” अशा आशयाचे कॅप्शन आरएसव्हीपी मूव्हिजने दिेले आहे.

कंगनाच्या ‘तेजस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर महिन्यापासून सुरूवात केली होती. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’नंतर सर्वेश मेवारा यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट असणार आहे. यात सैन्य दलाच्या साहसाची कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटात एका महिला वैमानिकेच्या साहसाची कहाणी दाखवण्यात आली आहे. २०१६ साली पहिल्यांदाच भारतीय विमान चालवण्यासाठी एका महिलेची नियुक्ती केली होती. तिच्याच जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.