कंगना रणौतच्या बहुप्रतिक्षित ‘सिमरन’ चित्रपटातील दुसरं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. चित्रपटातील ‘लगदी है थाय’ या पहिल्या गाण्यात कंगनाचा बिंदास अंदाज पाहायला मिळाला. हा एक डान्स नंबर होता तर ‘पिंजरा तोड के’ हे एक भावनिक गाणं आहे. पहिल्या गाण्यापासून अत्यंत वेगळा आणि सिमरनच्या जीवनाला जवळून दाखवणारं हे दुसरं गाणं आहे.

‘पिंजरा’ गाण्यातून कंगनाची चित्रपटातील भूमिका अधिकरित्या स्पष्ट होताना दिसते. सुनिधी चौहानच्या आवाजातील या गाण्याला सचिन-जिगरने संगीतबद्ध केलंय. ‘पिंजरा तोड के उड जाना है, बाहें खोल के उड जाना है,’ गाण्याचे हे बोल मनात सकारात्मक विचार निर्माण करणारे आहेत. स्वत:च्याच सहवासाचा आनंद घेणारी, एकटं राहायला न घाबरणारी कंगना यामध्ये पाहायला मिळते.

या गाण्यामध्ये आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेणारी कंगना पाहायला मिळते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, मनमौजी जगणाऱ्या सिमरनच्या भूमिकेचे विविध रंग यामध्ये पाहायला मिळतात. कंगनाचा हा आणखी एक स्त्री-प्रधान चित्रपट असल्याने तिचा दमदार अभिनय यातून पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही.

ट्विंकल खन्नाचा ‘टॉयलेट: एक प्रेम कथा पार्ट-२’ पाहा!

हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटाच्या पोस्टर्स आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एनआरआय नर्स संदीप कौरच्या आयुष्यावर ‘सिमरन’ चित्रपटाची कथा बेतलेली आहे. यामध्ये सिमरनला जुगार खेळण्याचा आणि चोरी करण्याचा आजार असतो. १५ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.