Kannada Actor Divya Suresh: कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक दिव्या सुरेश अडचणीत सापडली आहे. ४ ऑक्टोबर रोजी बंगळुरूच्या बयतरायणपुरा भागात रात्री एका दुचाकीला धडक देऊन पळ काढल्याचा तिच्यावर आरोप होता. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झालेली होती. दिव्या सुरशेच्या वाहनाने रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला, हे आता सिद्ध झाले आहे. या अपघातात दुचाकीवरील महिलेच्या पायाचे हाड तुटले.

४ ऑक्टोबर रोजी अपघात झाल्यानंतर ७ ऑक्टोबरला दुचाकीवर बसलेल्या २५ वर्षीय किरण याने पोलिसांत तक्रार दाखल केली. किरण त्याच्या चुलत बहिणी अनुषा आणि अनिताबरोबर रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास बयतरायणपुरा येथून जात होता. त्यावेळी त्यांना एका काळ्या रंगाच्या गाडीने धडक दिली.

गाडीने धडक दिल्यानंतर किरण आणि अनुषा (२४) यांना किरकोळ दुखापत झाली. तर ३३ वर्षीय अनिताच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिला बीजीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिचा पाय तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे किरणने तक्रारीत म्हटले आहे. यामुळे बीजीएसच्या डॉक्टरांनी पायावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, असे तक्रारीत म्हटले आहे.

कन्नड अभिनेत्री दिव्या सुरेश हीच त्या रात्री गाडी चालवत होती, असा खुलासा आता पोलिसांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे तपासल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. तसेच दुचाकीला धडक दिल्यानंतर किरणने एक महिला गाडी चालवत असल्याचे म्हटले होते. यानंतर पोलिसांनी अपघात स्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गाडी दिव्या सुरेशच चालवत असल्याचे म्हटले.

पश्चिम वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. अनूप शेट्टी यांनी म्हटले की, ज्या गाडीमुळे अपघात झाला, ती ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. तत्पूर्वी प्रत्यक्षदर्शी आणि अपघातग्रस्त पीडितांनी म्हटले की, अपघात घडल्यानंतर वाहन चालवणारी महिला थांबली नाही. धडक बसल्यानंतर चारचाकी वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला.

कोण आहे दिव्या सुरेश?

दिव्या सुरेश ही सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री असून ती माजी व्यावसायिक कबड्डीपटूही आहे. २०२१ मध्ये किचा सुदीप यांनी होस्ट केलेल्या कन्नड बिग बॉस ८ मध्ये तिने भाग घेतला होता. बिग बॉसमुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. त्याआधी २०१३ साली तिने चित्ते हेज्जे या कन्नड मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये ओम शक्ती, ओम शांती या मालिकेत काम केले होते.

मोठ्या पडद्यावर दिव्याने हुलिराया, फेस २ फेस, ध्वजा आणि रांची यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.