Kapil Sharma’s Cafe shares first response after firing incident : कपिल शर्मा याने नुकताच कॅनडा या ठिकाणी Kap’s कॅफे सुरू केला. कपिलनं मोठ्या थाटात पत्नी गिन्नी हिच्याबरोबर कॅफेचं उदघाटनदेखील केलं. त्यानं नव्या कॅफेचे फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
कपिलच्या याच नव्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात एकूण १० ते १२ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओदेखील सर्वत्र व्हायरल होत आहे.
तसेच कॅफेने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्या आहेत. त्यामध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर मेसेज आणि डीएम पाठवून ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला, त्या लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनी कॅनडा पोलिसांचेही आभार मानले आहेत. या हल्ल्यामागे खलिस्तानी हात असल्याचे वृत्त आहे.
कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांच्या कॅप्स कॅफेचे उदघाटन नुकतेच कॅनडातील सरे येथे झाले. गुरुवारी तेथे अचानक गोळीबाराची घटना घडली, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कॅफेच्या इन्स्टा स्टोरीवर या घटनेशी संबंधित एक संदेश आहे. त्यात लिहिले आहे की, ग्राहकांना टेस्टी कॉफी देण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण भावनेने सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हा कॅफे सुरू केला. जे स्वप्न आम्ही पाहिलं, त्या गोष्टीला हिंसाचाराला सामोरं जावं लागलं, हे हृदयद्रावक आहे. आम्ही या धक्क्यातून सावरत आहोत; पण आम्ही हार मानणार नाही.

पुढे त्यांनी लिहिलं, “आम्हाला तुम्ही जो पाठिंबा दिलाय, त्यासाठी धन्यवाद! आम्हाला तुम्ही या कठीण काळात DM द्वारे जे मेसेज केले आहेत, प्रार्थना केल्या आहेत, त्यासाठी कॅप्स कॅफेमधील आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद! आमच्यासाठी तुम्ही सर्व एकत्र आला आहात, यामुळेच तुमच्या विश्वासावर हा कॅफे उभा आहे. चला हिंसाचाराच्या विरोधात उभे राहूया. लोकांना आमचा कॅफे एकत्र आणतो, पुन्हा एकदा सर्वांना याची खात्री पटवून देऊया. लवकरच भेटू.”
गुरुवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे १.३० वाजता कॅप्स कॅफेबाहेर गोळीबार झाला. मात्र, या गोळीबारात कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. सरे पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यावेळी काही कर्मचारी कॅफेमध्ये होते. खिडक्यांवर गोळ्यांच्या किमान १० खुणा आढळल्या आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या घटनेशी खलिस्तानी फुटीरतावाद्यांचा संबंध आहे.