‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये फवादच्या ऐवजी दिसणार हा अभिनेता?

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटावर टांगती तलवार

करण जोहर, फवाद खान

पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता हिंदी चित्रपट सृष्टीतील काही कलाकार आणि निर्माता दिग्दर्शकांनी याचा विरोध केला होता. पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत ट्विटर आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाविश्वातील मंडळींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. या कलाकारांमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचाही समावेश होता. पण पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या करणने त्याच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या अनुशंगाने आपले विचार बदलले आहेत. सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार करण त्याच्या आगामी चित्रपटामधील पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या भूमिकेसाठी सैफ अली खानची नव्याने निवड करणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

मनसेने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ‘इम्पा’नेही भारतात पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी घातली होती. पाकिस्तानी कलाकारांविषयीचा हा वाढता विरोध पाहता करण जोहरच्या बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटावरही टांगती तलवार आली आहे. त्यामुळे करण सध्या त्याच्या या चित्रपचातून फवादची भूमिका बदलण्याच्या विचारात असल्याची सध्या चर्चा आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आयत्या वेळी कलाकारांच्या भूमिका बदलणे जवळपास अशक्यच असते. त्यामुळे आता करण ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये फवाद ऐवजी सैफला संधी देणार का? याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. फवादच्या ऐवजी या चित्रपटामध्ये सैफ अली खान दिसणार असल्याच्या चर्चेसोबतच करण या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा साकारत असलेल्या भूमिकांमध्येही काही बदल करु शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात अॅश आणि अनुष्का साकारत असलेल्या भूमिकांची पाळेमुळे पाकिस्तानातून असल्यामुळे करण हा सारा घाट घालत असल्याची चर्चा आहे.

वाचा: शाहरुखच्या ‘रईस’मधून माहिरा खानची हकालपट्टी?

याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती चित्रपटाशी संबंधित व्यक्तिंनी दिली नसल्यामुळे येणाऱ्या काळात या सर्वाचा खुलासा होईलच अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, भारतात पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीमुळे या कलाकारांची बॉलिवूड कारकीर्द अडचणीत आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karan johar to replace fawad khans face with saifs

ताज्या बातम्या