चित्रपट निर्माते करिम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानीला ५ एप्रिल रोजी करोना झाल्याचे समोर आले होते.  आता शाजाची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. मात्र तिची तिसरी करोना चाचणी केल्याशिवाय तिला रुग्णालयातून सोडणार नसल्याचे म्हटले जात आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाजा श्रीलंकेहून परतली होती. तेव्हा तिच्यात करोनाची कोणतीच लक्षणे दिसून आली नव्हती. पण काही दिवसांनी करोना चाचणी केल्यावर शाजा आणि तिची बहिण झोयाला करोना झाल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ त्यांचे वडिल करिम मोरानी यांची देखील करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. सध्या शाजावर नानावटी रुग्णालयात उपाचार सुरु आहेत.

काही दिवसांपूर्वी शाजाची बहिण झोयाने सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांना करोना विषयी माहिती दिली होती. ‘माझे वडिल आणि शाजामध्ये करोना झाल्यानंतर कोणतीही लक्षणे दिसली नाही. पण माझ्यामध्ये करोनाची काही लक्षणे आढळली. त्यामुळे मी लवकरच माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेणेकरुन तुम्हालाही त्याबद्दल थोडी माहिती मिळेल’ असे तिने पोस्टमध्ये लिहिले.

‘मला सरुवातीला थोडा ताप आल्यासारखे वाटत होते. तसेच छातीमध्येही दुखत होते. जर तुम्ही थोडा आराम केलात तर सहजपणे दुखणे कमी होते. प्राणायम आणि गरमपाणी मला करोनाशी लढण्यास खूप मदत करत आहेत. मी तुमच्यासोबत माझा अनुभव लवकरच शेअर करेन’ असे तिने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करुन काळजी घेण्यास सांगितले आहे.