अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकीवजा इशाऱ्यात भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाची मागणी केली. अमेरिकेने दिलेल्या या इशाऱ्यावरुन सध्या देशात वाद-विवाद सुरु झाले आहेत. दरम्यान अभिनेत्री कविता कौशिक हिने या प्रकरणार प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली कविता?

“आपण सर्व एकमेकांना घाबरवण्यात व्यस्त होतो. तेवढ्यात बाहेरचा कोणी आला आणि कुटुंबातील सर्वात मोठ्या सदस्याला धमकावून गेला.” अशा आशयाचे ट्विट कविता कौशिक हिने केले आहे.

कविता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती आपली मते बिनधास्तपणे व्यक्त करताना दिसते. यापूर्वी तिने ‘रामायण’ या मालिकेवर ट्विट केले होते.

“हे देवा आम्हा मुर्ख आणि स्वार्थी लोकांना माफ कर. ज्यावेळी आमच्यावर संकट कोसळलं त्यावेळी आम्हाला तुझी आठवण आली आणि आम्ही तुझ्या मालिका पाहू लागलो. नाहीतर आम्ही कायम ‘बिग बॉस’ आणि ‘रोडीज’ हेच शो पाहण्यात दंग असतो”, असं ट्विट तिनं केलं होतं.

काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?

“मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत असं सांगितलं आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नसता, तरी काही हरकत नव्हती. पण मग आम्हीही जशास तसं उत्तर दिलं असतं, आणि ते आम्ही का करु नये ?” असं ट्रम्प म्हणाले होते.

भारताने काय दिली होती प्रतिक्रिया?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधावरुन जशास तसे उत्तर देण्याची भाषा केल्यानंतर भारतानेही सुनावलं. “भारत आपल्या शेजारी देशांना व करोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल. COVID19 ची भयानकता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवतेच्या दृष्टीकोनातून एकजूटता आणि सहकार्य केले पाहिजे ही भारताची सुरुवातीपासून भूमिका आहे. आमच्यावर अवलंबून असलेल्या देशांना आम्ही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांचा पुरवठा करु. त्यामुळे यावरुन कुठलेही अंदाज बांधू नका तसेच राजकारणही करु नका” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं.