कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्यातील केवळ दुसरं आणि तिसरं कडवंच राज्यगीतात गायलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच यावर शाहीर साबळेंचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षात देशातील प्रत्येक राज्याचं स्वत:चं राज्यगीत असावं असं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजातील ‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’या गाण्याला महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतंच या गाण्यातील केवळ दुसरं आणि तिसरं कडवंच राज्यगीतात गायलं जाणार असल्याबद्दल केदार शिंदे यांनी भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “तुम्ही नसताना…” ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर शाहीर साबळेंच्या नातवाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

केदार शिंदे यांनी नुकतंच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “राज्यगीत किंवा राष्ट्रगीताला काही प्रोटोकॉल्स असतात. आधी आपण राज्यगीत नाही म्हणून टाहो करत होतो. आता आपल्याला राज्यगीत मिळालं आहे तर ते आपल्याप्रमाणे असावं असं होऊ शकत नाही. राज्यगीत किती सेकंदात किंवा मिनिटात गावं, असा प्रोटोकॉल असेल तर त्यात मला काही समस्या नाही. आपण जेव्हा राज्यगीत गाऊ, तेव्हा तीन कडवी गाऊयात. तीनच कडवी गायली जावीत असा अट्टाहास नसावा.”

आणखी वाचा : “आधीच सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलय अन् तुम्ही…” केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान २०२३ हे शाहिर साबळे यांचं जन्मशताब्दीवर्ष आहे. याच निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ असे याचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.