एक सुखी कुटुंब असतं. कर्ता पुरुष खच्चून पैसे कमवत असतो. सगळं घर ऐश्वर्याने भरून वाहत असतं. पत्नी सुखी, समाधानी गृहिणीप्रमाणे असते. त्यांच्या दोन तरुण मुली अगदी मॉडर्न असून आनंदात कॉलेज लाइफ जगत असतात. आणि अशा वेळी एक स्त्री पुरुषाच्या आयुष्यात येते आणि मग सुरू होतो एक अटळ झगडा. या सर्वाला परत खरंखुरं प्रेम, बौद्धिक प्रेम अशा कोंदणात बसवले असेल तर मग आणखीनच ताणाताणी होत असते. अशा कैक कथा, कैक वर्षांपासून आपण चित्रपट आणि टीव्हीच्या माध्यमातून पाहात आलो आहोत. पुन्हा तशीच कथा जर तुम्हाला वेबसीरिजच्या माध्यमातून पाहायची असेल तर पाहा. नाहीतर अजिबात या वाटेला जाऊ नका. ‘कहने को हमसफर है हम’ या वेबसीरिजचे अगदी थोडक्यात वर्णन करायचे तर या पद्धतीने करता येईल.
खरे तर वेबसीरिज हे माध्यम जरा वेगळं काही तरी करणाऱ्यांसाठी वरदान ठरलेलं माध्यम आहे. पण तथाकथित टीआरपीच्या नादापायी गेल्या १८ वर्षांत आपण टीव्हीवर जे काही पाहिले तेच इथेपण दाखवून चार पैसे कनवटीला लावायचे याचा चंगच मंडळींनी बांधलाय असे ठाम मत ही वेबसीरिज पाहिल्यावर होते. तीच तीच घासून घासून गुळगुळीत झालेली कथा ऐकवण्याचा मोह निर्मात्यांना का होतो, हाच प्रश्न इथे पडतो. त्यात पुन्हा नावात ‘क’ची बाराखडी आहे ती गोष्ट वेगळीच.
ही कथा आहे दिल्लीतल्या एका उच्च मध्यमवर्गीय वर्तुळातील. कथेचा नायक बहुत परिश्रमाने सीएच्या व्यवसायात स्थिरावला आहे. व्यवसाय, कुटुंब हे सर्व करताना त्याला स्वत:साठी काहीच करता आलं नाही. त्याला वास्तुविशारद व्हायचं असतं पण तो आकडय़ांमध्ये अडकतो. मग स्थिरता आल्यावर पन्नाशी गाठायच्या आधी त्याला खरं प्रेम सापडतं. (असं त्याच्या बाबतीत सहा वर्षांपूर्वी पण झालेलं असतं) पण घरदेखील सोडवत नसतं. मग सुरू होते एका तिढय़ाची कथा. त्याचं खरं प्रेम जिच्यावर आहे ती देखील एक व्यवहारी स्वतंत्र स्त्री आहे. त्याच्यापेक्षा बरीच लहान पण आहे. पण तीन र्वष झाली तरी तो तिच्याशी लग्न करत नसतो, पण न झालेल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतो. आणि तीपण हे सारं स्वीकारत असते. अचानक तिलापण साक्षात्कार होतो आणि आपण केवळ वापरले जातोय ही भावना निर्माण होते. या सगळ्या पाश्र्वभूमीवर सुरू होतो एक नेहमीचा ड्रामा. ‘कहने को हमसफर है हम’ हे शीर्षक मात्र याबाबतीत दोन्ही आघाडय़ांवर लागू पडते इतकीच काय ती सर्जनशीलता. बाकी वेगळं काही पाहायला मिळत नाही.
कथानकाचा हा प्रकार लोकप्रिय असेलही कदाचित पण ते सादर करण्यात जराही डोकं लावायची इच्छा इथे दिसत नाही. लोकेशन म्हणून दोन चांगली घरं भाडय़ानं घ्यायची, अधूनमधून आऊ टडोअर चित्रीकरण म्हणून शहरातील फ्लायओव्हर वगैरेचा एखादा शॉट वापरायचा, एखादा लग्नातील, शोरूममधील प्रसंग घ्यायचा या पलीकडे दिग्दर्शक जातच नाही. मग अशा वेळी दाखवायचं काय तर लांबलचक संवाद. अक्षरश: शब्दबंबाळ याशिवाय दुसरा शब्दच लागू होणार नाही. वादविवाद, तर्क, लॉजिक यांनी भरलेले हे संवादच तुम्हाला सतत ऐकावे लागतात. त्यात जोडीला आधुनिकतेचा ‘टच’ द्यायचा म्हणून इंग्रजीमिश्रित संवाद घुसडायचे की झाली पटकथा.
टीव्हीवरील त्याच त्याच साच्यातील मालिका पाहताना तुम्हाला त्या मालिकांमध्ये जितक्या उणिवा दिसतील त्या सगळ्या इथेपण दिसतात. कदाचित सीरिजकर्त्यांना मालिकेचेच वेब सीरिजमध्ये रूपांतर करायचे होते की काय, असे वाटू लागते.
विवाहबाह्य़ संबंध हा विषय जोपर्यंत विवाह संस्था अस्तित्वात आहेत तोपर्यंत राहणार हे जरी मान्य केलं तरी ते मांडताना सादरीकरणात जरा तरी वास्तवता आणायचा प्रयत्न केला असता तरी खूप बदल जाणवला असता. काही ठिकाणी असे मुद्दे घेण्याचा प्रयत्न दिसून येतो, पण सादरीकरणात कसलीही सर्जनशीलता नसल्यामुळे ते सारेच छापील पद्धतीने घडत जाते. थोडक्यात हेही वेबसीरिज पाहायची असेल तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पाहा इतकेच सांगता येईल.
- वेबसिरीज – कहने को सिर्फ हमसफर है सीझन पहिला
- ऑनलाइन अॅप – अल्ट बालाजी
