Kannada Actor Dinesh Mangaluru Passed Away : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ज्येष्ठ कन्नड अभिनेते आणि कला दिग्दर्शक दिनेश मंगळुरू यांचे निधन झालं आहे. सोमवारी पहाटे त्यांचं निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. टीव्ही९ च्या माहितीनुसार, त्यांनी उडुपी येथील आपल्या घरी पहाटे ३:३० वाजता अखेरचा श्वास घेतला.
दिनेश मंगळुरू हे ‘केजीएफ’, ‘किच्चा’, ‘किरिक पार्टी’ यांसारख्या गाजलेल्या कन्नड चित्रपटांमधील भूमिकांसाठी विशेष ओळखले गेले. त्यांनी ‘केजीएफ’ मध्ये बॉम्बे डॉनची भूमिका साकारली होती. ‘उदयवाणी’ या स्थानिक वृत्तपत्रानुसार, ‘कांतारा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना स्ट्रोक आला होता. त्यांच्यावर बेंगळुरूमधील रुग्णालयात उपचार झाले होते आणि त्यानंतर ते बरेही झाले होते.
मात्र गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांना अंकदकट्टे सर्जन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसंच काही वृत्तांनुसार, त्याना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते.
अभिनेता बनण्याआधी दिनेश यांनी अनेक चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. त्यांनी ‘प्रार्थना’, ‘तुग़लक’, ‘बेट्टादा जीव’, ‘सूर्याकांती’, ‘रावण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून महत्त्वाचं योगदान दिलं आहे. तसेच, त्यांनी ‘राणा विक्रम’, ‘अंबरी’, ‘सावरी’, ‘इंती निन्ना बेटी’, ‘आ डिंगी’, ‘स्लम बाला’ यांसारख्या चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
माहितीनुसार, त्यांचे पार्थिव सोमवारी संध्याकाळी बेंगळुरू येथे आणले जाणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून त्यांच्या लॅग्गेरे येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारी सुमनहळ्ळी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
दिनेश यांचा जन्म उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथे झाला होता, पण ते अनेक वर्षे बेंगळुरूमध्ये स्थायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी भारती आणि दोन मुलं – पवन आणि सज्जन असा परिवार आहे. या हरहुन्नरी अभिनेत्याच्या निधनानं मनोरंजन सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. अनेक चाहते त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.