भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर (कर्करोग) झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर सध्या मुंबईमधील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं वृत्त आहे.

खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी ३१ मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला खासदार किरण खेर या अनुपस्थित होत्या. त्यावेळी अरुण यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली. ६८ वर्षी खेर यांना गेल्यावर्षी या आजाराचं निदान झालं होतं. सध्या त्या उपचार घेत असून मुंबईमध्ये आहेत अशी माहितीही अरुण सूद यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, ‘गेल्या वर्षी नोव्हेंबर माहिन्यात किरण खेर चंदीगडमध्ये असताना त्यांना या आजाराबाबत कळालं. त्यानंतर त्यांना ४ डिसेंबर रोजी उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं. चार महिने उपचार घेतल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण त्यांना उपचारासाठी नियमितपणे रुग्णालयात जावं लागत आहे”, असं सूद यांनी म्हटलं आहे.