‘शरद तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे.. तू एक अत्युत्तम अभिनेता आहेस,’ असं म्हणत अभिनेते किशोर कदम यांनी अभिनेते शरद पोंक्षेंसाठी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून शरद पोंक्षे पुनरागमन करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर ते पुन्हा एकदा नव्या दमाने अभिनयासाठी सज्ज झाले आहेत. या निमित्ताने किशोर यांनी ही पोस्ट लिहिली आहे.

‘तुझ्या अभिनयातली व्होकॅब्युलरी तू कशी कुठून आत्मसात केली आहेस माहित नाही पण तू जी वाक्य बोलतोस ती सत्याच्या जवळ जाणारीच वाटतात. भूमिकेचा तू जो सारासार विचार करतोस तो एखाद्या प्रगल्भ अभिनेत्याचा असतो. तुझा आवाज उत्तम आहेच पण त्याचा वापर तू जसा करतोस त्यावरून तुला तुझा आवाज कळला आहे हे कळतं. काही नटांना आयुष्यभर काम करून स्वतःचा आवाजच गवसत नाही. तू ‘हिमालयाची सावली’ करतो आहेस हे तुझ्या डेडिकेशनचं फळ आहे. तू ‘तू’ आहेस हेही प्रेमात पडण्यासारखंच आहे,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

या पोस्टमध्ये किशोर यांनी नथुरामच्या भूमिकेचाही किस्सा सांगितला. त्या भूमिकेसाठी आधी किशोर यांना विचारण्यात आलं होतं. ‘तुझ्यातला प्रेमात पडणारा अॅरोगन्स, तुझ्यातली पॅशन, तुझ्यातला भूमिकेवर तुटून पडणारा योद्धा मला नेहमीच लुभावत आला आहे. मी तुझ्यावर नट म्हणून नितांत प्रेम करतो. माणूस म्हणून तू माझ्यात सतत एक एनर्जीचा स्रोत आहेस आणि तूझ्या घाऱ्या, राखाडी, मनमानी डोळ्यांची शपथ तू ग्रेट आहेस,’ अशा शब्दांत किशोर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.