‘कुंग फू योगा’ या सिनेमाचा अधिकृत ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. बॉलिवूडच्या दबंग खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्रेलरचा व्हिडिओ शेअरही केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तो जॅकी चॅनचे आभार मानायला विसरला नाही. सलमानने ट्विटमध्ये म्हटले की, ‘धन्यवाद जॅकी, या सिनेमात माझ्या छेदी सिंगला (सोनू सूद) घेण्यासाठी.’ सोनू या सिनेमात एक नकारात्मक भूमिका साकारत आहे. या सिनेमात हॉलिवूड स्टार जॅकी चॅन आणि बॉलिवूड अभिनेत्री दीशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत.
सलमानने या सिनेमासंदर्भात ट्विट केल्यानंतर काही मिनिटांतच या व्हिडिओला २ हजाराहूंन अधिक लाइक्स मिळाले. तर यूट्यूबवरही काही मिनिटांतच ४ हजाराहूंन अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. जॅकी चॅन आणि सोनू सूद एकत्र आले म्हटल्यावर सिनेमा तर अॅक्शनपॅक असणारच ना.. या ट्रेलरमध्ये जॅकी भारतीय गुंडांसोबत आणि सिंहासोबत लढताना दिसणार आहे.
‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशाने आतापर्यंत फक्त दोनच सिनेमे केले आहेत. पण एवढ्या कमी वेळातही तिची लोकप्रियता कमालीची वाढत चालली आहे. दिशाचा आगामी सिनेमा ‘कुंग फू योगा’ आहे. यात ती चक्क जॅकी चॅनसोबत काम करताना दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती भारत आणि चीन या दोन्ही देशातील प्रोडक्शनने मिळून केले आहे. त्यामुळेच या सिनेमात चिनी कलाकारांसोबतच अनेक भारतीय कलाकारही दिसून येतात. सिनेमात सोनू सूद, अमायरा दस्तूर आणि दिशा पटानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा पूर्णपणे बॉलिवूड स्टाइलने चित्रित करण्यात आला आहे.
Thank you @EyeOfJackieChan for giving this film to my Chedi Singh @SonuSood . This is the coolest : https://t.co/Nl0qk742pl
— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 17, 2017
‘कुंग फू योगा’ या सिनेमात बॉलिवूड तडका तर दिसतोच आहे. बॉलिवूड प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फराह खानने केले आहे. फराहने जॅकी चॅनसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जॅकीच्या नृत्याबाबत कौतुक करताना तिने असेही लिहिले होते की तिने त्याचे नाव जॅकी जॅक्सन असे ठेवले आहे. बीजिंग, दुबई आणि आयलॅण्डनंतर या सिनेमाचे शेवटच्या सत्राचे चित्रिकरण जोधपुरमध्ये करण्यात आले होते. ३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.