‘लाइफ ऑफ काइली’, ‘किपिंग अप विथ द कदार्शिअन’ या मालिकांमधील अभिनय व ट्विटर आणि इन्टाग्रामवरील मादक छायाचित्रांमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या हॉलीवूड टीव्ही स्टार काइली जेनरला तिच्या २०व्या वाढदिवसाला मिळालेल्या भेटीमुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मादाम तुसाँ संग्रहालयाने कायलीला तिच्या मेणाचा पुतळा वाढदिवस भेट म्हणून दिला. यामुळे या संग्रहालयाच्या इतिहासात सर्वात कमी वयाच्या प्रसिद्ध व्यक्तीचा पुतळा बसवण्याचा नवा विक्रम कायलीच्या नावावर नोंदला गेला आहे. काइलीने कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या दिवशी त्या मेणाच्या प्रतिकृतीचे अनावरण केले. तो पुतळा दिसायला इतका हुबेहुब होता की तेथील उपस्थित व्यक्तींनी आपली बोटे अक्षरश: तोंडात घातली. या अनोख्या भेटीबद्दल जेनरने आनंद व्यक्त केला. तिला तो पुतळा म्हणजे जणू तिची जुळी बहीणच वाटत होती. तिच्या मते आजवर आरशात स्वत:ला जितके निरखून पाहिले नसेल तितक्या वेळा तिने ती प्रतिकृती निरखून पाहिली. त्या हुबेहूब कलाकृतीबरोबर तिने छायाचित्रे काढून आपल्या चाहत्यांसाठीही लगेच इंटरनेटवर अपलोड केली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2017 रोजी प्रकाशित
अवघ्या २०व्या वर्षी मादाम तुसाँ संग्रालयात या अभिनेत्रीचा पुतळा
हा इतिहासातील सर्वात कमी वयाच्या प्रसिद्ध व्यक्तिचा पुतळा आहे
Written by मंदार गुरव

First published on: 30-07-2017 at 00:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kylie jenner madame tussauds wax statue hollywood katta part