भारदस्त आवाज आणि अभिनयाच्या स्वतंत्र शैलीमुळे मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविला होता. विनय आपटे यांनी अभिनय केलेला आणि ‘शिवलीला’ संस्थेची निर्मिती असलेला ‘साम दाम दंड भेद’ हा आगामी मराठी चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला आता शेवटचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात ते शेतकऱ्याच्या भूमिकेत आहेत.
विनय आपटे यांनी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील त्यांची ही भूमिका वेगळी आहे. जुन्या पिढीतील शेतकरी त्यांनी चित्रपटात साकारला आहे. चित्रपटाचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे चित्रपटात विनय आपटे यांच्यावर एक खास गाणे चित्रित करण्यात आले असून, ते प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी गायले आहे.
गीतकार-कवी गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या या गाण्याला संगीतकार विजय गवंडे यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘तुझी माया, तुझा पान्हा, माझे माऊली, कुठे सांग हरविली, तुझी सावली तुझ्याविना झालो आई पोरका जगी, जिव्हाराच्या शिवारात आटली सुगी’ असे या गाण्याचे शब्द आहेत.  
जुन्या पिढीतील शेतकरी, त्याचे शेतावर असलेले प्रेम, शेत म्हणजे आपली ‘आई’ अशी त्याची भावना. मात्र त्याचवेळी या शेतकऱ्याच्या नव्या पिढीचा, शेती म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा असा असलेला दृष्टिकोन. त्यातून निर्माण झालेला वाद, त्या शेतकऱ्याची व्यथा, वेदना आणि शेताचे तुकडे करून त्याची वाटणी करताना मनाला झालेल्या यातना, असा दोन पिढय़ांमधील संघर्ष या चित्रपटातून आम्ही मांडला आहे.
विनय आपटे यांची वेगळीच भूमिका यात पाहायला मिळणार असून, हा चित्रपट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे चित्रपटाच्या दिग्दर्शिका नीलिमा लोणारी यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. या चित्रपटात विनय आपटे यांच्यासह अलका कुबल-आठल्ये, तेजस्वीनी लोणारी, गिरीश परदेशी, ओंकार कर्वे आणि अन्य कलाकार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last marathi film of the late vinay apte
First published on: 04-03-2014 at 08:02 IST