टेलिव्हिजनवर अनेक वर्षांपासून सुरू असणारी लोकप्रिय मालिका कोणती असे कोणालाही विचारल्यास ‘सीआयडी’ हे नाव नक्कीच ऐकायला मिळणार. सरकार बदललं, मुलं लहानाची मोठी झाली तरी गेल्या २२ वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त भारताची गानकोकिळा अर्थात लता मंगेशकर यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच पुन्हा ही मालिका सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.

लतादीदींनी ट्विट करत लिहिलं, ‘नमस्कार. आज सीआयडी मालिकेचे एसीपी प्रद्युमन म्हणजेच शिवाजीराव साटम यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सीआयडी मालिका पुन्हा सुरू व्हावी अशी माझी इच्छा आहे.’ या ट्विटसोबतच लतादीदींनी शिवाजी साटम यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला.

सीआयडी या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणजे ‘एसीपी प्रद्युम्न सिंह’. अभिनेते शिवाजी साटम गेली २२ वर्षे ‘एसीपी प्रद्युम्न’ ही भूमिका साकारत आहेत. ते एका एपिसोडसाठी ५ लाख रुपये इतके मानधन घ्यायचे. विशेष म्हणजे शिवाजी साटम हे ‘सीआयडी’ मालिकेसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करायचे.