"मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो"... नाना पाटेकर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट | legendary actor vikram gokhale passes away nana patekar shares emotional post on social media | Loksatta

“मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो”… नाना पाटेकर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट

नाना पाटेकर यांनी वाहिली खऱ्या ‘नटसम्राटाला’ श्रद्धांजली

“मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो”… नाना पाटेकर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट
नाना पाटेकर आणि विक्रम गोखले

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका या तीनही माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालच ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं, पण आज सकाळी त्यांची प्रकृती आणखी ढासळली. नुकतंच विक्रम गोखले यांनी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. कित्येक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांनीदेखील त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची हळहळ व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर नाना यांनी विक्रम गोखले यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नाना यांनी लिहिले आहे, “विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो …..असेन…तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….”

नाना पाटेकर पोस्ट

नाना यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’ या चित्रपटात गणपतराव बेलवलकर ही अजरामर भूमिका साकारली होती. नाटकावर बेतलेल्या या चित्रपटात नाना यांच्याबरोबर विक्रम गोखले यांची एक खास भूमिकाही आपल्याला पाहायला मिळाली होती. जणू ही भूमिका खास चित्रपटासाठी आणि या २ नटांच्या दर्जेदार अभिनयासाठीच लिहिली गेली होती. या चित्रपटात विक्रम गोखले यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 18:07 IST
Next Story
“भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत”… विक्रम गोखलेंना राज ठाकरेंकडून श्रद्धांजली!