मॉडेल लिसा हेडनने Lisa Haydon गरोदरपणातील दिवसांचा मनमुराद आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले होते. या ‘क्वीन’ अभिनेत्रीने दोन दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिच्या आयुष्यातील इतर आनंदी क्षणांप्रमाणेच तिने ही गोड बातमीही सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांसाठी शेअर केली.

लिसाने पती डिनो लालवानीसोबतचा तान्हुल्या बाळाला हातात घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. ‘१७ मे २०१७ ला झॅक लालवानीचा जन्म झाला,’ असे कॅप्शनही तिने फोटोला दिलेय.

गरोदर असताना लिसाने बऱ्याचदा बेबी बम्पमधील फोटो शेअर केले होते. इतकेच काय तर बिकिनीतील बेबी बम्पमधील फोटो पोस्ट करत तिने गरोदर असल्याची बातमी सर्वांना सोशल मीडियावरून दिली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लिसाने तिच्या लग्नाची बातमी देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. लिसा आणि डिनोने कोणताही गाजावाजा न करता गुपचूप विवाह केला होता. तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर ही बातमी सर्वांना कळलेली.

रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात लिसा शेवटची झळकली होती. यात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेली. दिग्दर्शक विकास बहलच्या हिट ‘क्वीन’ चित्रपटात तिने साकारलेल्या कंगनाच्या बिंधास्त मैत्रीणीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नईत जन्मलेल्या लिसाचे अधिकाधिक आयुष्य परदेशात गेलेय. मुंबईत मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत वास्तव्यास होती. मॉडेलिंगच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या लिसाला नंतर लगेचच चित्रपटांच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली.