‘मॅजिक ऑफ थिएटर’ कार्यक्रमात विजया मेहता यांचे प्रतिपादन
आजकालच्या मुलांमध्ये आणि एकंदरीतच ‘कलाकारां’त एक गैरसमज खूपच दृढ झाला आहे. एखादी मुलगी किंवा मुलगा सुंदर दिसत असेल, तर त्याने मालिका, नाटक, चित्रपट यांत काम करायलाच हवे. किंबहुना सुंदर दिसणे ही या क्षेत्रात येण्याची गरज आहे. पण सुंदर दिसणे आणि अभिनय, या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची सरमिसळ होता कामा नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी आणि रंगभूमीवरील चालतेबोलते विद्यापीठ अशी ओळख असलेल्या विजया मेहता यांनी केले. माटुंगा येथील पोदार महाविद्यालयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या ‘मॅजिक ऑफ थिएटर’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अभियन, लेखन, गायन अशा सर्वच क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध केलेल्या अमृता सुभाष यांनी त्यांना बोलते केले.
रंगभूमीच्या अवकाशात ‘बाई’ अशी सार्थ ओळख असलेल्या विजया मेहता यांनी आतापर्यंत विविध नाटकांत भूमिका साकारल्या आहेतच. पण त्यांनी घडवलेल्या शिष्यांची नावेदेखील छाती दडपून टाकणारी आहेत. मात्र स्वत:मध्ये एक कलाकार दडला आहे, याचे भान नेमके केव्हा येते किंवा हे कसे कळते, या प्रश्नाला बाईंनी दिलेले उत्तर अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला अभिनय येतो किंवा एखादी कला आपल्या अंगात आहे, याचा साक्षात्कार स्वत:ला व्हावा लागतो. इतरांनी सांगून ती गोष्ट आपल्याला कळत नाही. वयाच्या १८व्या वर्षांपासून मी रंगभूमीवर काम करीत आहे. त्याआधी महाविद्यालयातील एका नाटकात काम केले होते. पण त्यानंतर आपल्याला हेच करायचे आहे, हे प्रकर्षांने जाणवले. आता या वयातही मी तेच करीत आहे, असे सांगत बाईंनी आपला प्रवास उलगडला.
एका फ्रेंच नाटककाराचा दाखला देत त्यांनी रंगभूमी म्हणजे काय, हेदेखील विशद केले. रंगभूमी म्हणजे सर्वात मोठे असत्य आहे. मात्र हे असत्य आपल्याला वैश्विक सत्याकडे घेऊन जाते, असे त्यांनी सांगताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अमृता सुभाष यांनीही ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकातील त्यांची भूमिका शोधण्यास बाईंनी त्यांना कशी मदत केली, तो प्रवास कसा होता, हे सादरीकरणाच्या माध्यमातून दाखवून दिले. आर. ए. पोदार महाविद्यालयाच्या सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील विद्यार्थानी केलेल्या गणेश स्तवनाने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शशी व्यास यांनी या कार्यक्रमामागील आपली भूमिकाही स्पष्ट केले. मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांनीही जाहीर प्रश्न विचारत या कार्यक्रमात अधिक रंग भरले.