प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनेक सेलिब्रिटी त्रिवेणी संगममध्ये स्नान करण्यासाठी महाकुंभमेळ्यात जात आहेत. अभिनेत्री ममता कुलकर्णीने तर महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला. आता एका अभिनेत्रीने इथेच दीक्षा घेतल्याची माहिती समोर आली आहे. ‘इंदू सरकार’ फेम ३० वर्षीय अभिनेत्री इशिका तनेजाने ग्लॅमरविश्वाला अलविदा केलं आहे.

इशिका तनेजाने लंडनमधून शिक्षण घेतलंय, ती मिस वर्ल्ड टुरिझम राहिली आहे. पण आता तिने अध्यात्माची वाट निवडली आहे. इशिका आता सनातन धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. इशिका तनेजाने द्वारका-शारदा पीठचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून गुरू दीक्षा घेतली आहे. प्रसिद्धी आणि नाव कमावल्यानंतरही आयुष्यात काहीतरी कमी आहे, असं वाटत होतं. आयुष्यात सुख व शांती खूप महत्त्वाची आहे, त्याशिवाय आयुष्य सुंदर नाही, असं इशिकाने सांगितलं.

मी साध्वी नाही, सनातनी – इशिका तनेजा

‘आज तक’शी बोलताना इशिका तनेजा म्हणाली, “मी साध्वी नाही, मी सनातनी आहे. महाकुंभात दैवी शक्ती आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे मला शंकराचार्यजींकडून गुरु दीक्षा मिळाली आहे. गुरू मिळाल्याने जीवनाला दिशा मिळते.”

इशिका पुढे म्हणाली, “माझा प्रवास खूप वेगळा राहिला आहे. मला गिनीज बुकचा पुरस्कार मिळाला होता. मी मिस वर्ल्ड टुरिझम राहिले. भट्ट साहेबांबरोबर सीरिज केली. टी-सिरीजची अनेक गाणी केली, पण मी योग्य वेळी माघारी परतले. स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला बनलेल्या नाहीत. त्या सनातनच्या सेवेसाठी बनलेल्या आहेत.”

टीआरपी वाढवण्यासाठी कुंभ मेळ्यात आली इशिका?

टीआरपी वाढवण्यासाठी महाकुंभला आली आहे का? आणि यानंतर ती पुन्हा तिच्या शोबिज दुनियेत जाईल का? असं विचारल्यावर इशिका तनेजा म्हणाली, “माझा प्रवास खूप पूर्वीपासून सुरू झाला होता. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा देखील एक भाग राहिले आहे. इशिकाने आयआयटी बाबा आणि हर्षाबद्दल वक्तव्य केलं. त्यांचा हेतू बघावा, विचार पाहावे, विकारांकडे पाहू नये. ते सगळे सनातनचा प्रचार करत असेल तर अडचण काय आहे?”

जुन्या लूकमध्ये परत जाणार का इशिका?

दीक्षा घेतल्यानंतर इशिकाच्या सोशल मीडियावर तिचे भगव्या कपड्यांमधील फोटो पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुढील ६ महिन्यांनंतरही तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर हाच लूक दिसणार का? असं तिला विचारण्यात आलं. ती म्हणाली, “मी पुन्हा कधीच जुन्या लूकमध्ये दिसणार नाही.जर मला चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्कीच करेन, पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन.”

सनातनमध्ये फॅशनच्या आवश्यकतेबद्दल इशिका म्हणाली, “तुम्ही फॅशनेबल पद्धतीने भगवे कपडे परिधान केले नाही तर ते कसे दिसतील? भगवे कपडे घालणं ही अभिमानाची बाब आहे, तरुणींनी सुंदर पद्धतीने भगव्या साड्या नेसल्या, तरच प्रचार होईल. सनातन फॅशनेबल असायला पाहिजे आणि सनातन सत्तेतही असायला पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक लढवणार का इशिका?

निवडणूक लढवण्याबाबत इशिका तनेजा म्हणाली की तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत. तसेच ती बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचे तिने स्पष्ट केले. यापूर्वीही फोन आले होते, पण आपण बिग बॉसच्या ऑफर नाकारल्याचं तिने सांगितलं.