Mahavatar Narsimha New Record : गेल्या काही दिवसांपासून एका अ‍ॅनिमेटेड चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे, तो चित्रपट म्हणजे अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिम्हा’. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. अशातच आता या चित्रपटानं आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.

‘महावतार नरसिम्हा’ हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ८० हिंदी चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाने अवघ्या २० दिवसांत भारतात ₹१३८.७५ कोटींची कमाई करत, वरुण धवनचा ‘जुड़वा २’ (₹१३८.५५ कोटी), आयुष्मान खुरानाचा ‘बधाई हो’ (₹१३७.३१ कोटी) आणि अक्षय कुमारचा ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ (₹१३४.४२ कोटी) या चित्रपटांना मागे टाकले आहे.

‘महावतार नरसिम्हा’च्या बॉक्स ऑफिसवरील यशाला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे, ‘महावतार नरसिम्हा’ हा पूर्णपणे भारतीय अ‍ॅनिमेटेड चित्रपट आहे. भारतीय अ‍ॅनिमेशन आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसं स्पर्धेत नव्हतं. पण या चित्रपटाने ते अंतर कमी करत भारतीय अ‍ॅनिमेशनलाही नव्या उंचीवर नेलं आहे. भगवान विष्णूंच्या विविध अवतारांवर आधारित ही सात भागांची भव्य अ‍ॅनिमेटेड सीरिज असून, ‘महावतार नरसिम्हा’ हा सीरिजचा पहिला यशस्वी टप्पा आहे. या यशामुळे पुढील भागांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

रजनीकांत यांच्या ‘कुली’ आणि ऋतिक रोशन-जूनियर एनटीआर यांच्या ‘वॉर २’ या मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शानामुळे ‘महावतार नरसिम्हा’च्या कमाईवर परिणाम होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. कारण बहुतांश स्क्रीन्स या चित्रपटांना दिल्या गेल्या होत्या. पण ‘वॉर २’ला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे, ‘महावतार नरसिम्हा’ला अधिक प्रेक्षक पसंती मिळण्याची संधी मिळाली आहे. यामुळे चित्रपटाची एकूण कमाई ₹१८५.५० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, पहिला आठवडा संपल्यानंतर, ‘महावतार नरसिम्हा’’ चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई केली. ‘सैयारा’, ‘सन ऑफ सरदार २’ आणि ‘धडक २’ यांसारख्या चित्रपटांबरोबर स्पर्धा असूनही या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. Sacnilk नुसार, ‘महावतार नरसिम्हा’ने पहिल्या आठवड्यात ४४.७५ कोटी तर दुसऱ्या आठवड्यात ७३.४ कोटींची कमाई केली आहे. आज (१४ ऑगस्ट २०२५)पर्यंत ही कमाई १८५.५० कोटी इतकी झाली आहे.