Mahavatar Narsimha Box Office Collection Day 13: सध्या बॉक्स ऑफिसवर एका अॅनिमेटेड चित्रपटाचा जलवा पाहायला मिळतोय. ‘महावतार नरसिम्हा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. फक्त वीकेंडलाच नाही, तर इतर दिवशीही हा चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करतोय. ‘महावतार नरसिम्हा’ हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अॅनिमेटेड सिनेमा ठरला आहे.

‘महावतार नरसिम्हा’ दररोज ‘सैयारा’, ‘सन ऑफ सरदार 2’ व ‘धडक 2’ च्या एकूण कलेक्शनपेक्षा जास्त कमाई करत आहे. रिलीजच्या १२ दिवसांनंतरही या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. ‘महावतार नरसिम्हा’ने १०० कोटींचा टप्पा ओलांडला असून त्याची १५० कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ज्या पद्धतीने चित्रपटाचं कलेक्शन वाढतंय, ते पाहता हा टप्पा गाठणं ‘महावतार नरसिम्हा’साठी कठीण नाही.

‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिणामी या चित्रपटाचे कलेक्शन वाढतच आहे. चित्रपटाने १३ व्या दिवशीही दमदार कमाई केली आहे. ‘महावतार नरसिम्हा’चे १३ दिवसांचे कलेक्शन किती झाले, ते जाणून घेऊयात.

महावतार नरसिम्हाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘महावतार नरसिम्हा’ चित्रपटाने १३ व्या दिवशी ६ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर सिनेमाचे भारतातील एकूण कलेक्शन ११२.८० कोटी झाले आहे. ‘महावतार नरसिम्हा’चे जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन १३८ कोटी रुपये झाले आहे.

पाहा ट्रेलर-

‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाने आतापर्यंत पूर्ण आठवड्यात ६-८ कोटींपेक्षा कमी कमाई केलेली नाही. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ४४.७५ कोटी रुपये कमावले. त्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी ७.७ कोटी, शनिवारी १५.४ कोटी, रविवारी २३.१ कोटी, सोमवारी ७.३५ कोटी आणि मंगळवारी ८.५ कोटी आणि बुधवारी ६ कोटी रुपये कमावले. आता दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट कशी कामगिरी करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

२ तास १० मिनिटांच्या या अॅनिमेटेड चित्रपटाची कथा जुनीच आहे, पण अॅनिमेशन जबरदस्त आहे. दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या ‘महावतार नरसिम्हा’चे बजेट फक्त ४ कोटी रुपये आहे. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.