सध्या बॉक्स ऑफिसवर दोनच चित्रपटांचा जलवा आहे. पहिला म्हणजे मोहित सुरीचा ‘सैयारा’ आणि दुसरा म्हणजे अॅनिमेटेड चित्रपट ‘महावतार नरसिम्हा’. ‘महावतार नरसिम्हा’ने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली होती. पण जसजशी लोकांना या चित्रपटाबद्दल माहिती मिळाली, तसतशी हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये गर्दी वाढू लागली.

‘महावतार नरसिम्हा’ फक्त वीकेंडलाच नाही तर इतर दिवशीची कोट्यवधींची कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १५ दिवस झाले आहेत आणि या अॅनिमेटेड चित्रपटाने अनेक चित्रपटांच्या कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता त्याने आलिया भट्टच्या एका सिनेमाच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे.

‘महावतार नरसिम्हा’चे कलेक्शन

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘महावतार नरसिम्हा’ने पहिल्या आठवड्यात ४४.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आणि त्याने ७३.४ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर तिसऱ्या शुक्रवारी ‘महावतार नरसिम्हा’ने ८ कोटी रुपये कमावले. ‘महावतार नरसिम्हा’चे भारतातील एकूण कलेक्शन आता १२६.२५ कोटी रुपये झाले आहे.

आलिया भट्टच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडला

‘महावतार नरसिम्हा’ने १५ दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमाने आलिया भट्टचा चित्रपट ‘राजी’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे. आलिया भट्टचा ‘राजी’ २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देशभरात १२३.७४ कोटी रुपयांची कमाई केली होती.

ओटीटीवर कधी येणार ‘महावतार नरसिम्हा’?

बॉक्स ऑफिसवर ‘महावतार नरसिम्हा’ची जादू पाहून निर्मात्यांनी तो ओटीटीवर लवकर प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. “‘महावतार नरसिम्हा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणि ओटीटी रिलीजच्या चर्चेबद्दल आम्ही आभारी आहोत. परंतु सध्या हा चित्रपट जगभरातील फक्त चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तसेच अद्याप या सिनेमाच्या डिजिटल रिलीजबद्दल कोणताही ओटीटी करार करण्यात आलेला नाही. त्यामुळे कृपया आमच्या अधिकृत हँडलवरून येणाऱ्या अपडेट्सवरच विश्वास ठेवा,” अशी पोस्ट चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे.

महावतार सिनेमॅटिक यूनिव्हर्सचे सहा चित्रपट येणार

दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महावतार नरसिम्हा’चे बजेट ४० कोटी रुपये आहे. ‘महावतार नरसिम्हा’ हा महावतार सिनेमॅटिक यूनिव्हर्सचा पहिला चित्रपट आहे. आगामी १२ वर्षांमध्ये या फ्रेंचायझीचे आणखी सहा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी ‘महावतार परशुराम’ २०२७ मध्ये, ‘महावतार रघुनंदन’ २०२९ साली, ‘महावतार द्वारकाधीश’ २०३१ साली, ‘महावतार गोकुलानंद’ २०३३, ‘महावतार कल्की भाग १’ २०३५ आणि ‘महावतार कल्की भाग २’ २०३७ साली प्रेक्षकांच्या भेटीला येईल.