झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील व्यक्तिरेखा अनेकांच्या आवडीच्या बनल्या आहेत. या मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जोडी सुद्धा प्रेक्षकांना भावते आहे. या मालिकेत इंद्राचे पात्र साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे. त्याने स्वत: एक व्हिडीओ पोस्ट करत सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. सुदैवाने या अपघातात त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

अजिंक्यने या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर त्याने “तुम्हाला मिळालेला प्रत्येक दिवस फार कृतज्ञतेने जगा”, असे कॅप्शन त्याने हा व्हिडीओ शेअर करतेवेळी म्हटलं आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ अपघातानंतरचा आहे. तसेच तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. यावेळी त्याने देवाचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

“आताच आमच्या गाडीचा अपघात झाला आहे. पण आता आम्ही ठीक आहोत. नशिबाने आमच्या गाडीचा वेग नियंत्रणात होता, म्हणून खूप भयावह असे काही घडले नाही. तसेच आजूबाजूला दरी असणारा रोड नव्हता. आमची गाडी स्केट झाली आणि ती ११०० व्होल्टच्या खांबावर आदळणार होती पण मित्राने ती आदळू नये यासाठी ती कंट्रोल केली. पण तरीही ती स्केट झाली. पण झाडीमुळे आम्ही वाचलो. देवाची कृपा म्हणजे त्याने आम्हाला झेललं. त्यामुळे मला यंदाची दिवाळी बघता आली. घराच्यांसाठी घेतलेले गिफ्ट्स मी अपघातानंतर जमा करत होतो. हे सर्व झाल्यानंतर कधीही काहीही संपू शकतं हे समजलं.” असे तो म्हणाला.

“नमस्कार मी अजिंक्य राऊत, आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली. वर्षातून एकदा दरवर्षी दिवाळीला मी परभणीला जातो. यंदाही मी जाताना रस्त्यात माझ्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी सुखरुप आहे.” असे त्याने सांगितले.

“या अपघातानंतर एक गोष्टी नक्की शिकलो ती म्हणजे कोणतेही फेम, कोणताही पुरस्कार या कोणत्याही गोष्टी काहीही उपयोगाच्या नसतात, ज्यावेळी एखादा जीवघेणा प्रसंग समोर येतो. त्यातून मला देवाने वाचवलं. मी खरंच भाग्यवान आहे. या उरलेल्या आयुष्यात मला काही तरी चांगलं करता येईल, अशी माझी अपेक्षा आहे. स्वत:ची काळजी घ्या. कारण माझ्या लक्षात आले आहे की, सर्व काही एका सेकंदात सर्व काही संपू शकते. कोणताही चमत्कार होण्याची वाट पाहू नका. फक्त पुढे जा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा.” असेही तो म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत सध्या दिवाळी सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक भान राखत या मालिकेने एक चांगला संदेश दिला आहे. देशपांडे कुटुंबीय फटाके न फोडता फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी रोप लावण्याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे, असा संदेश देताना दिसत आहेत.