कसा योगायोग आहे बघा, एकाच वेळेस तीन बड्या अभिनेत्यांच्या बंगल्याच्या तीन तर्‍हा दिसताहेत. दिलीपकुमारचा पाली हिलवरील बंगल्याचे बरेच काम होता होताच काही वादही निर्माण झाले. त्यात सायरा बानू विजयी झाली. वांद्र्याच्या कार्टर रोडवर गेल्यावर हमखास नजरेत भरणारा असा राजेश खन्नाचा ‘आशीर्वाद ‘ बंगला पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे दिसते आणि फक्त त्याचा ‘फ्लॅशबॅक ‘ डोळ्यासमोर येतो. तर शाहरुख खानचा अलिबागच्या निसर्गाच्या सान्निध्यातील बंगला आयकर खात्याने सीलबंद केल्याने एक नवीन चर्चा सुरु झालीय. आणि बीग बी अधूनमधून आपल्या आजारपणाच्या काळात (म्हणजेच १९८२ सालापासून) सायंकाळी प्रतिक्षा बंगल्याच्या गॅलरीतून चाहत्यांचे दर्शन घेणे सुरु केले. हल्ली बिग बी त्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट करतात.

बंगला हे चित्रपट कलाकारांचे अगदी कृष्ण धवल चित्रपटाच्या काळापासून स्टेट सिम्बल. वरळी सी-फेसवरील ‘जानी’ राजकुमारच्या बंगल्यापासून ते राज कपूरच्या चेंबूरच्या आर. के. कॉटेजपर्यंत यात खूप गोष्टी, किस्से, कथा, दंतकथा प्रचलित आहेत.

फार पूर्वीची मुंबईची सीमा माहीम-सायन इतकीच होती. फिल्मवाल्यानी वांद्र्याच्या पाली हिल व जुहूला पसंती दिली. आज मुंबई किती, कशी, केवढी वाढली हे आपण पाहतोय. म्हणूनच तर फिल्मवाल्यानी लोणावळा (धर्मेंद्रचा तेथे बंगला असल्याची चर्चा आहे), अलिबाग (सुनील शेट्टीपासून अक्षय खन्नापर्यंत अनेकांचे बंगले पाहणे देखिल पर्यटन होईल), येऊर अशा ठिकाणी बंगले उभारले.

काही बंगल्यांच्या गोष्टी रंजक-रोचक

पूर्वी स्टार्सच्या बंगल्यात मिनी थिएटर बांधण्याची पध्दत होती. राजेंद्रकुमारच्या ‘डिंपल’, सुनील दत्तच्या ‘अजंठा’ (दोन्ही पाली हिल) बंगल्यातील मिनी थिएटरमध्ये अनेक चित्रपटांच्या ट्रायल्सना जाण्याचा योग आला असता दिपून जायला होई. विशेषत: ‘डिंपल’ प्रिव्ह्यूच्या सीटस कमालीच्या आलिशान होत्या. अजंठात ‘थानेदार’ चित्रपटातील ‘तम्मा तम्मा लोगे…’ गाण्यावरचे संजय दत्त व माधुरी दीक्षितचे भन्नाट नृत्य पाहून सुनील दत्त कमालीचा प्रभावित झाला व त्याने ते सात वेळेस ‘वन्स मोअर’ केले. तो अनुभव विसरणे शक्यच नाही. हे दोन्ही बंगले त्यांच्या मुलांनी पाडून अर्थात अनुक्रमे कुमार गौरव व संजय दत्त यांनी पाडून तेथे इमारत उभारली.

राजेश खन्नाच्या बंगल्याचा मालक अगोदर राजेंद्रकुमार होता. तेव्हा या बंगल्याचे नाव ‘डिंपल’ होते. ‘आराधना’ सुपर हिट ठरवल्यावर राजेश खन्ना गिरगावातील सरस्वती भुवनमधील घर सोडून या बंगल्यात आला तेव्हा त्याने बंगल्याचे नाव ‘आशीर्वाद’ असे ठेवले. त्याची जबरा क्रेझ असतानाच्या काळात त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची अफाट गर्दी होई. त्याची ‘इम्पाला’ गाडी बाहेर पडताच प्रचंड ओरडा होई. कार्टर रोडवरच संगीतकार नौशाद यांचा ‘आशियाना’ बंगला होता. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचाही बंगला याच रोडवर होता. रेखाची भूमिका असणाऱ्या त्यांच्या ‘आस्था’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस त्यांनी आम्हा काही सिनेपत्रकाराना तेथे आमंत्रित केले.

शाहरुखचा बॅन्ड स्टॅन्डवरील ‘मन्नत’ बंगल्यात पूर्वी शूटिंग होत. ‘तिरंगा’मधील राजकुमार व नाना पाटेकर यांच्यावरील ‘पीले पीले ओ मोरे राजा…’ या गाण्याचे चित्रीकरण येथेच रंगले. आज ‘मन्नत’ बंगल्यावर शाहरुखच्या वाढदिवसाला त्याच्या ‘फॅन्स’ची प्रचंड गर्दी असते. हेच त्याचे वैभव. ‘मन्नत’ मुंबईतील महत्त्वाचे पर्यटन स्थळ झाले आहे. मुंबई दर्शनाची बस त्याच्या बंगल्यावरून सलमान खानच्या घरावरुन जाते. स्टारचे बंगले हा त्यांच्या चाहत्यांचा कमालीचा आवडतीचा विषय आहे. आपल्या चित्रपटाने जगभर झेप घेतली, तरी मुंबई पाहून आपल्या शहरात/ गावात जाणार्‍याला एक महत्त्वपूर्ण प्रश्न हमखास होतो. कोणत्या स्टारचे बंगले पाहिले? बसमधून वा बाहेरून बंगला पाहणारा मग विलक्षण खुलतो व हा अनुभव रंगवून सांगतो. कित्येक चाहते या स्टार्सच्या बंगल्यासोबत सेल्फी काढण्यात मोठाच आनंद मानतात.

जुहूत आशा पारेखपासून धर्मेंद्र, डॅनी, हेमा मालिनी असे अनेकांचे बंगले आहेत. मनोजकुमारने आपला बंगला पाडून दोन इमारतींची ‘जयहिंद सोसायटी’ उभारलीय. अमिताभचे साधारण एकाच परिसरात तीन बंगले आहेत. ‘जनक’ बंगल्यात तो पाहुण्यांची भेट घेतो. अभिषेक-ऐश्वर्य यांचा विवाह सोहळा त्याने ‘प्रतिक्षा’ बंगल्यात साजरा केला. पूर्वी याच बंगल्यात होळीचा रंग एन्जॉय होई. जुहूलाच संगीतकार लक्ष्मीकांत यांच्या ‘पारसमणी’ बंगल्याच्या जागेवर त्याच नावाने देखणी इमारत उभी राहिलीय. ‘पारसमणी’ हा संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीचा पहिला चित्रपट. त्याची स्मृती त्यांनी जपलीय.

बंगल्यात राहिल्याने शान वाढते पण तो मेन्टेनही करणे आवश्यक असते. ऋषि कपूर व नीतू सिंगने पाली हिलवरील आपला बंगला छान जपलाय, तरी काही वर्षांपूर्वीच तेथे डेंग्यू अळ्या सापडल्याचे वृत्त गाजले. त्यांच्या शेजारीच गुलजार यांचा ‘बोस्कीयाना’ बंगला त्यांच्या काव्यमय प्रतिमेची आठवण देतो. बोस्की हे गुलजार व राखी यांच्या दिग्दर्शक मुलीचे नाव हे ज्ञात आहेच.

चित्रपट कलाकारांच्या बंगल्यांच्या गोष्टी या अशा बहुरंगी. आता निवांतपणा हवाय म्हणून मुंबईपासून जवळ बाहेरगावी बंगले घेणे, बांधणे हा ट्रेंड रुळलाय. पण आपण स्टार आहोत म्हणजे आपल्याला मुंबई असो वा बाहेरगावी कुठेही-कसाही धिंगाणा घालून कसे चालेल? फार पूर्वी जुहूमधील रणजितच्या बंगल्यावरील त्याची खाजगी पार्टी रंगात येताच, ते शेजारच्याच संजय खानच्या बंगल्यावर चाल करून गेल्याचे वृत्त खूप गाजले. असेच काही अधेमधे घडते व फिल्म स्टार्सचे बंगले हा लोकप्रिय विषय चर्चेत येतो.
दिलीप ठाकूर
(छाया सौजन्य – Bollywood Now/YouTube)