बॉलिवूड अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) आत्महत्या केली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सेलिब्रिटींपासून ते क्रीडाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये अभिनेता मनोज बाजपेयीनेदेखील सुशांतला श्रद्धांजली वाहिली असून त्यांची एक लहानशी आठवण सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज वाजपेयी आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनी ‘सोनचिडिया’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्यानिमित्ताने मनोज आणि सुशांतची चांगली गट्टी जमली होती. त्यामुळे सुशांतच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर त्याला धक्का बसला आहे. अशातच त्याने सुशांतची एक आठवण शेअर केली आहे.

“मला आजही आठवत, सुशांतला मटन रस्सा खूप आवडायचा. त्यामुळे बऱ्याच वेळा तो माझ्या घरी दुपारी किंवा रात्री जेवायला यायचा. पण आता तो कधीच माझ्या घरी जेवायला येऊ शकणार नाही, हा विचारचं मला सहन होत नाहीये”, असं मनोज वाजपेयी म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “सोनचिडियाच्या चित्रीकरणादरम्यान आमच्यात छान मैत्री झाली होती. तो काळ आज झरझर डोळ्यासमोर येत आहे. त्याच्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण आठवत आहे. मात्र आता तो या जगात नाही हेच सत्य आहे. तो प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी कायम उत्सुक असायचा”.

दरम्यान, कलाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. यात प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, सारा अली खान, रणवीर सिंग,दीपिका पदुकोण, सलमान खान, शाहरुख खान, मीरा चोप्रा रविना टंडन, उर्वशी रौतेला, प्रविण तरडे, एकता कपूर अशा अनेकांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj vajpayee remembering days of shooting of film sonchiraiya with sushant singh rajput ssj
First published on: 16-06-2020 at 08:46 IST