नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते म्हणून अरुण नलावडे यांना ओळखले जाते. अरुण नलावडे यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अगदी साध्या भूमिकाही ताज्या केल्या. सध्या अरुण नलावडे हे‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. अरुण नलावडे हे नेहमी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडताना दिसतात. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीदरम्यान मराठी भाषा सक्तीबद्दल भाष्य केले आहे.
नुकतंच अरुण नलावडे यांनी नुकतंच सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मराठी भाषा सक्ती, मुलांचे शिक्षण याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, “आपली भाषा ही आपल्या घरातून सुरु झाली पाहिजे असे माझे म्हणणं आहे. जर तुम्ही एक वर्षाच्या मुलासोबत त्याचे आई वडील इंग्रजीने सुरुवात करणार असतील तर आपण आपली भाषा टिकणारच कशी? आपण ती मुलांना शिकवली पाहिजे. मुलांना ती आवडत नाही असं कोणी ठरवलं, त्यांना ती आवडते.”
Video: मुंबईतील उड्डाणपुलावर बेचकीच्या सहाय्याने बगळ्यांची शिकार, सयाजी शिंदेंनी व्यक्त केला संताप
“पण आपणच मुलांसमोर हाऊ आर यू, प्लीझ, असे शब्द मुलांसमोर म्हटले तर त्यांना मराठी शब्द कळणार कसे? त्यामुळे मराठी भाषा ही आपल्या घरातून सुरु झाली पाहिजे. लहान मुलं ही अनुकरण प्रिय असतात. तुम्ही जसे त्यांच्यासमोर वागता त्याचेच अनुकरण होते आणि तेच मुलं पुढे नेतात. त्यामुळे त्या भाषेची सुरुवात किंवा त्याचा अभ्यास हा घरातून सुरु व्हायला पाहिजे. शाळेत होतो किंवा नाही हा पुढचा भाग आहे”, असेही त्यांनी म्हटले.
“मी माझ्या मुलाला मराठी शाळेतून शिकवलं आहे. त्याला फार सज्ञान आणि हुशार बनवलं आहे. त्यानंतर आता तू कोणतीही भाषा शिक, अशी वेळ आपण आणली पाहिजे. आपण दरवेळी सरकारला किंवा राजकारणी लोकांना शिव्या देत राहतो. पण आपण स्व:त काय करतो? आपल्यापासून सुरुवात का होत नाही? असा अंतर्मुख होऊन विचार करावा असे मला वाटतं”, असेही ते म्हणाले.
“पण खंत एकच आहे की शिवसेनेचा…”, केदार शिंदे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा सक्ती हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यावर आता अनेक कलाकारही व्यक्त होताना दिसत आहे. यापूर्वीही अनेक मराठी कलाकारांनी मराठी भाषेबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यानंतर आता अरुण नलावडे यांनी स्पष्टपण त्यांना मराठी भाषेबद्दल काय वाटतं हे सांगितले आहे.