हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने घराघरांत पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांना ओळखले जाते. सयाजी शिंद हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसत आहे. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियाद्वारे प्रत्येकाला वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करताना दिसतात. नुकतंच त्यांनी स्वत: एक १०० वर्षे जुन्या झाडाचे पुन्हा वृक्षारोपण केले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. त्यामुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

सयाजी शिंदे यांनी फेसबुकवर २६ जानेवारी रोजी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी पुण्यातील एका जुन्या झाडं कशापद्धतीने साताऱ्यात जाऊन वृक्षारोपण केले, याची सविस्तर माहिती सांगितली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील हे झाड तब्बल १०० वर्ष जुनं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“नमस्कार, आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड, काल हडपसरला रस्त्यावर १०० वर्ष जुनं झाडं उन्हात पडलेले दिसले. त्यानंतर आम्ही रातोरात निर्णय घेतला आणि साताऱ्यातील गोळीबार मैदानात तो लावण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यात जैवविविधता उद्यान करण्यात येत आहे. तेथे आज तो वृक्ष लावण्यात आला”, अशी माहिती सयाजी शिंदे यांनी या व्हिडीओद्वारे दिली आहे.

https://fb.watch/b4HUUhtGqj/

त्यापुढे ते म्हणाले की, माझा सांगायचा उद्देश एवढाच की १०० वर्ष जुन्या वडाच्या झाडावर ४०० जीवजंतू जगत असतात. त्यामुळे ते वाचवलेच पाहिजे. पण, नाईलाजाने ते झाड काढावं लागत असेल तर ते दुसरीकडे कुठेतरी लावता येईल याचीही काळजी घेतली पाहिजे. पुण्यातील हे १०० वर्ष जुनं झालं साताऱ्यातील गोळीबार मैदान येथे पुन्हा लावण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सयाजी शिंदे यांनी त्या झाडाची पुन्हा लागवड केली आहे. त्यामुळे त्या झाडाला नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या कृत्यानंतर अनेकजण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.