वीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अलीकडेच ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. यावरून राजकीय नेत्यांकडून निषेध केला. यावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. अशातच अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांच्याबद्दलचा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर सक्रीय असतात, ते स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर भाषणातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणालेत “एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढं करायचा, असं म्हणतात. पण सावरकर म्हणतात की एक मान कापल्यावर पुढे करायला मानच राहत नाही, म्हणूनच मान कापणाऱ्याने आपली मान कापायच्या आधी आपणच त्याची मान कापायची, याला म्हणतात धर्म,” असं त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.
महात्मा गांधी अहिंसेचे पुरस्कर्ते होते. ते आपल्या भाषणांमधून कायम अहिंसेचे महत्व पटवून द्यायचे. ते नेहमी सांगायचे एखाद्या व्यक्तीने आपल्या गालावर थप्पड मारली, तर दुसरा गाल पुढे करायचा. पण शरद पोंक्षेंनी मात्र महात्मा गांधींचा प्रत्यक्ष उल्लेख न करता, त्याच संदर्भाने सावरकरांचे विचार त्यांच्या व्हिडीओतून सांगितले आहेत.