‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन सुरु असलेला वाद अद्यापही शांत झालेला नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर आपले आक्षेप नोंदवत जोरदार टीका केली होती. त्यातच आता हा चित्रपट झी मराठी वाहिनीवरुन प्रदर्शित केला जाणार असल्याने नव्याने वाद रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवभक्त अभिनेते सुबोध भावेच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी त्याने आपण यापुढे ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका साकारणार नाही अशी घोषणाच करुन टाकली आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटात सुबोध भावेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील काही उल्लेख आणि दृश्यांवरुन वाद असून ते काढून टाकावेत अशी शिवभक्तांची मागणी आहे. त्यातच हा चित्रपट आता झी मराठीवर प्रदर्शित होणार असल्याने कोल्हापुरातील शिवभक्तांनी सुबोध भावेची भेट घेऊन आक्षेपार्ह सीन वगळण्याची मागणी केली. यावेळी सुबोध भावेने आपण यापुढे कोणताही बायोपिक करणार नाही, अशी भूमिका मांडली.

“ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहासकारांची समिती नेमावी”, संभाजीराजेंची मागणी; म्हणाले, “इतिहासाची मोडतोड करून आज…”

“माझं महाराजांवरील प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं आहे. ते मी मरेपर्यंत करत राहणार. पण इथून पुढे ऐतिहासिक चित्रपटातील कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शुटिंग सुरू असलेल्या शेवटचा बायोपिक सिनेमा असेल,” असं सुबोध भावेने म्हटलं आहे.

संभाजीराजेंचं जाहीर आव्हान

सेन्सॉरमध्येही ऐतिहासिक टीम असते असा दावा सुबोध भावे यांनी केला आहे. यासंबंधी संभाजीराजेंना विचारण्यात आलं असता त्यांचा कितपत अभ्यास आहे अशी विचारणा त्यांनी केली. बेळगावात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सुबोध भावेंनी पत्रकार परिषद घेऊन मी मांडलेले मुद्दे चुकीचे आहेत असं सांगावं. जे मी पाच-सहा मुद्दे मांडले त्यावर त्यांनी बोलावं. मी केलेली भूमिका रास्त आहे, याच्यात काही चुकीचं नाही हे महाराष्ट्राच्या लोकांना सांगावं. त्यावेळी स्त्रियांचा बाजार भरत होता हे त्यांनी सांगावं. महाराजांनी नरसिंहाचा अवतार होऊ अफजल खानाचा कोथळा फाडला हे त्यांनी बोलावं. सिनेमाटिक लिबर्टी योग्य की इतिहास हे त्यांनी सांगावं. शिवभक्त आहे ना तो, मग माझे मुद्दे खोडून काढावेत,” असं आव्हानच संभाजीराजेंनी दिलं आहे.