Sumeet Raghvan Angry Post : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मंडळी सामाजिक आणि राजकीय विषयांवर अगदी ठामपणे व्यक्त होत असतात. आपली मतं ठामपणे मांडणाऱ्या कलाकारांमध्ये सुमीत राघवन हे नाव नेहमीच आघाडीवर असतं. मराठी भाषेचा मुद्दा असो… राजकारण असो किंवा कोणताही सामाजिक प्रश्न… सुमीत कायमच आपलं स्पष्ट मत मांडतो. याच स्पष्टवक्तेपणामुळे सुमीत सर्वांचीच मनं जिंकून घेतो.
एक सुजाण आणि सजग नागरिक म्हणून सुमीतनं अनेकदा सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्याची बिनधास्त आणि बेधडक मतं व्यक्त केली आहेत. सुमीत राघवन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे फोटो-व्हिडीओ, तसेच कामानिमित्त माहिती शेअर करीत असतो. तसेच या सोशल मीडियाद्वारे तो त्याची सामाजिक आणि राजकीय मतंही व्यक्त करताना दिसतो
अशातच आता त्यानं कचऱ्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. सुमीतनं SustainifyYourLife या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला कळसूबाई शिखरावरील कचऱ्याचा व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीत म्हणतो, “शरम वाटते… खरंच कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र?”
पुढे तो म्हणतो, “एरव्ही ‘शिवरायांचा महाराष्ट्र’ म्हणून गळा काढणारा प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांच्या अनुयायांची अशा वेळी अस्मिता दुखावली जात नाही? घेईल का कोणी जबाबदारी? कठोर कारवाई होईल का? आपल्या ऐतिहासिक वास्तूंची आपण काळजी घेऊ शकतो का? हा प्रश्न जनतेलासुद्धा आहे.”

दरम्यान, SustainifyYourLife या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कळसूबाई शिखरावर सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. कचऱ्याच्या या व्हिडीओसह असं म्हटलं आहे, “महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर प्लास्टिकच्या विळख्यात! कळसूबाई हे पूर्वी निसर्गप्रेमींसाठी एक पवित्र ठिकाण मानलं जायचं. पण, आज तिथे चहाच्या कपांपासून पाण्याच्या बाटल्यांपर्यंत ते चिप्सच्या रिकाम्या पुड्यांपासून इतर कचर्यानं संपूर्ण परिसर भरून गेला आहे. ७०% पेक्षा जास्त ट्रेकर्स ट्रेकिंगदरम्यान प्लास्टिकसारख्या वस्तू वापरतात. पण, हा कचरा जातो तरी कुठे? ते सगळं परत डोंगरावरच फेकलं जातं.”