मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून अभिनेते वैभव मांगले यांना ओळखलं जातं. वैभव मांगले यांचे ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक प्रचंड गाजले. या नाटकात त्यांनी चिंची चेटकीणीची भूमिका साकारली होती. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी या नाटकाला रामराम केला. नुकतंच त्यांनी यामागचे कारण सांगितले आहे.
वैभव मांगले हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत त्यांचा चाहतावर्ग आहे. नुकतंच त्यांनी ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘अलबत्या गलबत्या’, ‘करुन गेलो गाव’ ही नाटकं सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.
आणखी वाचा : “नितीन देसाईंची घटना, राजकारण्यानी बुडवलेले पैसे अन्…”, प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफरच्या जिवाला धोका, म्हणाला “त्याच्याबद्दल काही पुरावे…”
“मी अलबत्या गलबत्या नाटक जेव्हा केलं, तेव्हा झी मराठी होतं. निलेश मयेकर तेव्हा होता. अत्यंत हुशार आणि दूरदृष्टी असणारा निलेश हा झी मध्ये हेड पदावर काम करत होता. हे नाटक करणं हा त्याचा प्रस्ताव होता. त्याच्या प्रस्तावामुळे झी तेव्हा टॉपला होतं, त्यामुळे अलबत्या गलबत्या हिट झालं. त्यावेळी निलेश मला म्हणाला होता की, जर या नाटकात तू चेटकीणीची भूमिका करणार असशील, तरच आपण करुया. बालनाट्य करायचं की नाही, हा प्रश्न होता. पण माझा निलेशवर पूर्ण विश्वास होता आणि झी चं सध्या काहीही लोक बघतात. झीवर त्यावेळी चाललेला प्रत्येक कार्यक्रम लोक पाहत होते. कारण विश्वास होता, लोकांना सवय होती.
झीचं ‘अलबत्या गलबत्या’ नावाचं नाटकं येतंय, हे लोकांना माहिती झालं आणि त्यानंतर लोक अक्षरश: तुटून पडले. आम्ही प्रचंड प्रयोग केले. पण एका वेळेनंतर या नाटकासाठीचं बुकींग कमी झालं. कारण झीच थोडं डाऊन झालं. त्यात एक समस्या अशी झाली की आम्ही ते नाटक पुरवून पुरवून खायला हवं होतं.
आम्ही ते नाटक सुट्ट्यांच्या वेळी काढायला हवं होतं. ज्यावेळी मुलं मोकळी असतात, त्यांना फार अभ्यास नसतो. आम्ही सतत दीड वर्ष हे नाटक केलं. त्यामुळे त्या नाटकाचा प्रेक्षक वर्गच कमी झाला. त्यात करोना आला. बुकींग कमी झालं. त्यानंतर निर्मात्यांशी वाद झाला. मला याच निर्मात्याचा ‘करुन गेलो गाव’ या नाटकावेळीही अनुभव आला होता. त्यामुळेच मी ते सोडलं. त्यानंतर ‘अलबत्या गलबत्या’ नाटकासाठी निलेशने आग्रह केला म्हणून मी ते केलं. मी ते नाटक करण्यासाठी आधी तयारच नव्हतो”, असे वैभव मांगले म्हणाले.
आणखी वाचा : अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान रत्नाकर मतकरींनी हे नाटक रंगभूमीवर आणलं, तेव्हा या नाटकात चेटकिणीची भूमिका दिलीप प्रभावळकर साकारत होते. बरीच वर्ष त्यांनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर त्यानंतर काही वर्षांनी चिन्मय मांडलेकरने हे नाटक दिग्दर्शित करण्याचं ठरवलं, तेव्हा वैभव मांगले यांनी चेटकिणीच्या भूमिका साकारली. त्यांची ही चिंची चेटकीण लहान मुलांच्या आवडीची बनली होती. फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही ती आवडली. पण त्यानंतर वैभव मांगलेंनी हे नाटक सोडल्याचं कळताच सर्वांचाच भ्रमानिरास झाला.