भावा-बहिणीच्या नात्याचे महत्त्व सांगणारा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन! आज, म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरे केले जाईल. या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा धनश्री नव्या जोमाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. नुकतंच तिने तिच्या रक्षाबंधनाचा एक किस्सा सांगितला आहे.
धनश्री ही लवकरच झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ असं या मालिकेचं नाव आहे. येत्या १५ ऑगस्टपासून ही नवी मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत धनश्री नकारात्मक भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दिपा चौधरी या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसेल. या निमित्ताने त्या दोघींनीही त्यांच्या रक्षाबंधनाच्या गोड आठवणींचा खुलासा केला आहे.
‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरची कोल्हापूरकरांसाठी खास पोस्ट, म्हणाली “इथं आलं की…”
यावेळी दिपा चौधरी आपल्या भावाबद्दल म्हणाली, “आमचे नाते खूप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझे काम त्याला खूप आवडते. तो अनेकदा मला नवीन नवीन गोष्टी सुचवतो. या वर्षी देखील तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने आम्ही रक्षाबंधन साजरे करणार आहोत.” यानंतर धनश्रीनेही तिच्या बालपणीच्या रक्षाबंधनाच्या काही गोड आठवणी शेअर केल्या आहे.
“आम्ही लहानपणी खूप भांडायचो. भन्नाट मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे गेलं की मला देण्यासाठी त्याच्याकडे छानशी भेट वस्तू असायची. पण मला तो मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा. पण या वर्षी कामात व्यस्त असल्यामुळे भेट होईल की नाही शंका आहे. पण आम्ही रक्षाबंधन नक्की साजरा करु”, असे धनश्री काडगावकरने सांगितले.
ग्लॅमरस ‘वहिनीसाहेब’, धनश्री काडगावकरचे प्रेग्नंसीनंतरचे फोटो पाहिलेत का?
दरम्यान धनश्री ही या मालिकेत शिल्पी नावाची भूमिका साकारत आहे. यात अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दिपा चौधरी या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसेल. मोठ्या ब्रेकनंतर उत्तम काम करायला मिळत असल्याने धनश्री फारच खूश आहे. धनश्रीने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. धनश्रीने तिच्या बाळाचे नाव कबीर असे ठेवले आहे. बाळाच्या जन्मानंतर तिचे वजन फारच वाढले होते. मात्र तिने जबरदस्त मेहनत घेत वजन कमी केले आहे.