अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगी कवीने अभिनेत्री छाया कदम हिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मला तुझा अभिमान वाटतो, असे म्हटलं आहे.
हेमांगी कवी हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने झुंड चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री छाया कदम दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने त्याला भावूक कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
हेमांगी कवीची इन्स्टाग्राम पोस्ट
“प्रत्येक अभिनेत्याला वाटत असतं की आयुष्यात साला एकदा तरी बच्चन सोबत काम करायला मिळावं. सुप्त इच्छा कधीतरी पूर्ण होऊ देत यासाठी प्रार्थना करत असतो. किती स्वप्न पडतात की आपण बच्चन सोबत सीन करतोय याची. निदान मला तरी पडतात. माझ्यासाठी स्वप्नवतच आहे ते.
पण #झुंड च्या निमित्ताने छाया कदम तू ते खरं करून दाखवलंस. एक सीन मिळावा किंवा एक डायलॉगही चालेल किंवा पासिंगसुद्धा मिळालं त्यांच्या फ्रेममध्ये तरी भरून पावू असं वाटतं. पण तू चक्क त्यांच्या बायकोचा रोल किंवा पार्टनर म्हणू शकतो असा रोल केलास. तेवढ्याच ताकदीनं उभी राहिलीस. कुठून आणलंस एवढं बळ यार? खरंच एक अभिनेत्री म्हणून, एक मैत्रीण म्हणून तुझा अभिमान वाटतो आणि तुझ्या संपूर्ण अभिनय प्रवासाचं कौतुक ही. और क्या चाहीए! कसलं भारी वाटतंय काय सांगू यार.”“यासाठी नागराज मंजुळेंचे आभार मानेन की त्याने तुझ्यातल्या कसदार अभिनेत्रीवर, मैत्रिणीवर एवढा विश्वास दाखवला! किती conviction असेल त्याला तुला cast करायचं! नाहीतर इथं बरेच जण नुसतंच ‘तू किती भारी अभिनेत्री आहेस, कमाल मैत्रीण आहेस’ असं सांत्वनपर बोलून ‘अगं, producer ला, प्रथितयश actor समोर अमुक अमुक अभिनेत्रीच cast करायचीय गं, माझ्या हातात असतं ना तर तुलाच cast केलं असतं’ हे ‘बच्चन’ देऊन पळ काढतात.”
“असो, तुला त्यांच्या सोबत काम करताना पाहून वाटलं साला आपणच काम करतोय. क्या बात है… Proud proud and extremely happy! Love u रे! आणि माझी तुझ्या सोबत काम करायची इच्छा एक नाहीतर दोन चित्रपटांमुळे पूर्ण झाली म्हणून मज्जा!”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.
“तुमचा नवरा कोणत्या…”, अभिनेत्री क्रांती रेडकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. हेमांगी कवी ही सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.