Prajakta Mali Visited Bhimashankar On Her Birthday : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीवर संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर हळूहळू ती चित्रपटांकडे वळली. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.
प्राजक्तासाठी इंडस्ट्रीतील कलाकारांनीही खास स्टोरी पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वीच १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची यात्रा सुरू केली होती. आज वाढदिवशी भीमाशंकरचं दर्शन घेऊन प्राजक्ताची ही यात्रा पूर्ण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता कुटुंबाबरोबर आज भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. मंदिरातील काही फोटोही तिने शेअर केले आहेत. यामध्ये प्राजक्ता शंकराच्या पिंडीवर तीर्थ अर्पण करताना दिसत आहे. प्राजक्ताबरोबर तिची आई, दोन भाच्या, वहिनी दिसत आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोजला तिने कॅप्शनदेखील दिलं आहे. तिने लिहिले, “भीमा शंकर ज्योतिर्लिंग- पुणे- महाराष्ट्र आणि अशा प्रकारे आज वाढदिवसाचं औचित्य साधून, भीमा नदीच्या काठी, निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या ‘भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे’ सहकुटुंब दर्शन घेऊन १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली.” प्राजक्ता माळी काही दिवसांपूर्वी केदारनाथालाही जाऊन आली. तसेच तिने बद्रीनाथचंही दर्शन घेतले. आता भीमाशंकरच्या दर्शनाने प्राजक्ताची १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण झाली आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली. तिने या मालिकेत मेघना हे पात्र साकारलं होतं. मालिकेला छोट्या पडद्यावर भरभरून प्रेम मिळालं.
छोट्या पडद्यावर यश मिळाल्यावर प्राजक्ता पुढे चित्रपटांकडे वळली. प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनदेखील करते. नुकताच ‘फुलवंती’ चित्रपटासाठी प्राजक्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मराठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.