मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी दोन्हीकडे कलाकार आणि निर्माते यांचं कधीच पटत नसतं हे आपण ऐकून आहोत. मराठीतील कित्येक कलाकारांनी याबद्दल उघडपणे खुलासादेखील केला आहे. शेवटी हा एक व्यवसाय आहे त्यामुळे प्रत्येकाला यातून काहीतरी रिटर्न हवे असतात, पण तरी कलाकार आणि निर्माते यांच्यातली ही दरी अजुनही भरून निघालेली नाही. याबद्दल मराठी अभिनेत्री शिल्पा तुळसकर हिने नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे.

‘अमृता फिल्म्स’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री शिल्पा तुळसकर हिने चित्रपट, नाटक, मालिका यामध्ये काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. याच मुलाखतीमध्ये तिने निर्माते आणि त्यांच्याकडून असणाऱ्या कलाकारांच्या माफक अपेक्षा याबद्दलही भाष्य केलं आहे. बरेच निर्माते पैसे वाचवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करण्यास मनाई करतात यामुळे चित्रपटावर परिणाम होतो असं शिल्पाने स्पष्ट केलं आहे. शिवाय कलाकारांबरोबरच टेक्निशियनलासुद्धा चांगलं मानधन द्यायला हवं याबद्दलही शिल्पाने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

आणखी वाचा : “ही भूमिका एक परिपूर्ण…” ‘धारावी बँक’ वेबसीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणाऱ्या सुनील शेट्टीने शेअर केला अनुभव

एका कलाकाराच्या निर्मात्याकडून काय माफक अपेक्षा असतात त्याबद्दल शिल्पा म्हणाली, “अगदी बेसिक गोष्टी अपेक्षित असतात. एक स्वच्छ मेकअप रूम, एक स्वच्छ वॉशरूम, वेळेवर ब्रेक्स, काम वेळेवर पूर्ण करणं आणि कलाकाराला लागणाऱ्या प्रॉपर्टी पुरवणं. या अगदी बेसिक गोष्टी अपेक्षित असतात. एका चित्रपटातून किंवा कलाकृतीतून मिळणारी मिळकत दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये लावल्यावर काही लोकांची देणी थकतात, आणि यामुळे निर्मात्यांचं नाव खराब होतं. केवळ पैसे वेळेवर देणारा निर्माता उत्तम निर्माता होत नाही, तर रोजच्या रोज सेटवर या सगळ्या गोष्टींची दखल घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.”

निर्माते बऱ्याच गोष्टीत काटछाट करतात पैसे कमी करतात याविषयी शिल्पा म्हणाली, “बरेच निर्माते अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कंजूसी करतात, बऱ्याच लोकांचे पैसे कमी करतात. यामुळे संपूर्ण युनिटवर त्याचा परिणाम होतो. कित्येक निर्माते चहा कॉफीसुद्धा अगदी ठरवूनच देतात, एवढा बजेटचा प्रॉब्लेम खरंतर हिंदी किंवा मराठी कुठल्याच इंडस्ट्रीत नाहीये. काही निर्माते तर सेटवर मॅगी सुद्धा करू देत नाहीत कारण गॅस वाया जातो. बऱ्याच टेक्निशियनचे पैसे मारले जातात, त्यांचे पैसे कमी करून निर्माता मोठा होत नसतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीमध्ये शिल्पाने लवकरच निर्मिती क्षेत्रात उतरणार असल्याचंही स्पष्ट केलं. शिल्पाने ‘वीर शिवाजी’, ‘तुला पाहते रे’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शिवाय ‘डोंबिवली फास्ट’सारख्या चित्रपटातून तिच्या अभिनयाचं लोकांनी प्रचंड कौतुकही केलं आहे. नुकत्याच ‘झी मराठी’वरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून शिल्पाने पुन्हा छोट्या पडद्यावर एंट्री घेतली. यामध्ये तिने स्वप्नील जोशीबरोबर मुख्य भूमिका साकारली आहे, प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केलं.