अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आज पुन्हा एकदा देवीच्या रुपातील नवा फोटो शेअर करत रुग्णसेवा करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी देवीच्या रुपातील वेगवेगळे फोटो शेअर करत करोना काळात लढणाऱ्या लढवैय्याचे आभार मानत आहे. त्यातच आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तिने रुग्णसेवा करणाऱ्या रुग्णवाहिनी चालकांचे आभार मानले आहेत.
”नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार…तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश, जणू दु:खांचा प्रहार…बोचऱ्या नजरा असंख्य,अस्वस्थ नकोश्या जाणिवा. दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्णसेवा ?”, असं कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, यापूर्वी तेजस्विनीने देवीच्या रुपातील पाच वेगवेगळे फोटो शेअर केल आहेत. या प्रत्येक फोटोमधून तिने मुंबई पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि मुक्या प्राण्यांसाठी झटणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले आहेत.