नवरात्रोत्सवाची धूम सध्या सर्वत्र पाहायला मिळतेय. दांडिया, गरबा, देवीची आराधना या सर्वच गोष्टींवर अनेकांचं लक्ष आहे. नवरात्रीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्त्रीशक्तीचा जागरही सुरू आहे. मुख्य म्हणजे यामध्ये कलाकार मंडळींचासुद्धा उल्लेखनीय सहभाग आहे. विविध मार्गांनी महिलांच्या कलागुणांना, त्यांच्यातील ताकदीला सलाम करण्यासाठी कलाकार मंडळी पुढे सरसावत आहेत. या साऱ्यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरतेय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत.

‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटापासून ते ‘१०० डेज’ या मालिकेपर्यंत प्रत्येक आव्हानात्मक भूमिकेला मोठ्या ताकदीने न्याय देणारी ही अभिनेत्री. सध्या ती चर्चेत आहे ते म्हणजे नवरात्र विशेष फोटोंमुळे. अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि फॅशन ब्रॅण्ड चालवणाऱ्या तेजस्विनीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबत तिने #navratri #irony #tejaswinipandit असे हॅशटॅगही जोडले आहेत. सौंदर्याला दाहक वास्तवाची जोड देत काही महत्त्वाच्या मुद्द्यावर तिने या फोटोंच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे.

तिने पोस्ट केलेले फोटो पाहता नवरात्रीचे नऊ दिवस महिलांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडणार असल्याचं स्पष्ट होत आहे. आपण मुलीच्या शिक्षणापेक्षा तिच्या लग्नसमारंभावर वारेमाप उधळपट्टी करतो. एकीकडे ‘पॉर्न स्टार’चा सेलिब्रिटी म्हणून स्वीकार करतो पण बलात्कार पीडितेचा सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनही स्वीकार करताना का संकोचतो? असे महत्त्वाचे प्रश्न तेजस्विनीने या फोटोंच्या कॅप्शनमधून पोस्ट केले आहेत. गर्भात असणाऱ्या मुलीचा जीव घेऊन शेजारच्या मुलींना बोलवून कन्या पूजा करण्याकडेही तिने कटाक्ष टाकला. तेजस्विनीने पोस्ट केलेले हे फोटो आणि त्याचे कॅप्शन अनेकांना खडबडून जाग आणतील असेच आहेत. सोशल मीडियावर तिच्या या अनोख्या उपक्रमाला अनेकांनीच पाठिंबा दिला आहे. येत्या दिवसांमध्ये तिची आणखी कोणती रुपं पाहायला मिळणार याबाबतही कुतूहलाचं वातावरण आहे.