अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. नुकतंच विशाखा सुभेदारने तिच्या वजनाबद्दल भाष्य केले आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या बस बाई बस या कार्यक्रमात विशाखा सुभेदार सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिला तिकडच्या बसमधील महिला प्रवाशांनी अनेक प्रश्न विचारले. एखाद्या कार्यक्रमादरम्यान सहसा कॉमेडी कलाकारांना गांभीर्याने घेत नाही, असे कधी झालंय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, असं कधी होत नाही. पण एका कार्यक्रमादरम्यान माझ्या वजनावरुन माझी खिल्ली उडवण्यात आली होती.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर पुढे काय करणार? विशाखा सुभेदारने केला खुलासा

विशाखा सुभेदार नेमकं काय म्हणाली?

“मी एका कार्यक्रमाला गेली होती. त्यावेळी तिथे सूत्रसंचालन करणाऱ्यांनी माझी ओळख करुन देताना आता आपल्यासमोर येत आहे वजनदार व्यक्तीमत्त्व विशाखा सुभेदार आणि त्यांचं वजन जितकं अभिनयात महत्त्वाचे आहे, तितकंच त्यांचं वजन… असे तो सतत वजन वजन बोलत होता. त्यानंतर मी जेव्हा बोलायला गेली तेव्हा एका वजनदार व्यक्तीमत्त्वाची एका किरकोळ माणसाने अत्यंत वजनदार पद्धतीने ओळख करुन दिली आहे. तर या वजनदार माणसाकडून त्या किरकोळ आणि सामान्य माणसाला अतिशय मानाचा मुजरा. त्यावेळी त्याला अतिशय खजील झाल्यासारखे वाटले.

त्यानंतर त्या व्यक्तीने माझी माफी मागितली. त्यावेळी तो म्हणाला, ‘मी सहज विनोद करायला गेलो.’ तेव्हा विशाखाने त्याला म्हटले त्या वजनाचे किंवा विनोदाचे आम्हाला पैसे मिळतात. तुम्ही आता माझे जे जाडेपण लोकांच्या डोळ्यासमोर उघडं पाडलात त्याचे मला पैसे मिळत नाही. मग मी का ऐकून घेऊ. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, मला वाटलं तुम्हाला मज्जा येईल. जस इतर स्किट्समध्ये तुमच्या वजनावर बोललो की तुम्ही हसण्यावारी नेता. त्याचे पैसे द्या मला चालेल.

जाडेपणा आणि बारीक यात एखाद्या बाईमध्ये जो भेद केला जातो, त्याचा त्रास होतो. एखादी आई ही कायम बिचारी बारीक, सोशिक आणि आंबाडा बांधलेली असते. मग एखादी जाडी बाई बिचारी सोशिक असू शकत नाही का?? त्यामुळे त्या भूमिका साकारता येत नाही. कारण मी कोणत्याच अँगलने गरीब बिचारी वाटत नाही”, असे विशाखा सुभेदारने म्हटले.

आणखी वाचा : “बालगंधर्वच्या प्रयोगानंतर मी कायम युरीन इन्फेक्शन घरी घेऊन जाते…”, विशाखा सुभेदारने सांगितली नाट्यगृहांची भीषण अवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडच्या काळात, विशाखा ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ६६ सदाशिव (२०१९) या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. सध्या ती कुर्रर्र या नाटकात काम करत आहे.