Aata Thambaycha Nay : अभिनेता सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सर्वच कलाकारांचे काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात. पण काही सिनेमे खास असतात. ते मनात घर करतात आणि कायम राहतात. सिद्धार्थसाठी असाच मनात घर करणारा चित्रपट म्हणजे ‘आता थांबायचं नाय’ होय. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो, जी फक्त यशस्वीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते — तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळंच असतं.

‘आता थांबायचं नाय’ हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे, जो ५० दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला. सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता. तो एक प्रवास होता — एका हरवलेल्या बापाचाही, आणि एका खऱ्या कलाकाराचाही. सिद्धार्थने या चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रेमाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जणून सगळं मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंबच जवळ आलं – सिद्धार्थ जाधव

“रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करत आहे. सुमीत राघवन, दिलीप रावळकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळं मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंबच जवळ आलं. २५ दिवस, मग ५० दिवस… आणि तेही तुफान हाऊसफुल शोज… ती आठवण कायम लक्षात राहील,” असं सिद्धार्थ जाधव म्हणाला.

मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक संयत बाप. न बोलणारा, पण गारुड करणारा. परिस्थितीनं थोडासा हरवलेला, पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा. सिद्धार्थने केवळ अभिनय केला नाही तर त्यानं ते पात्र जगून दाखवलं. चित्रपटाला मिळणारं प्रेम, हे यश फक्त वैयक्तिक नाही. सिद्धार्थच्या मते, हा सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज ‘आता थांबायचं नाय’ हा सिनेमा अजूनही थिएटरमधून घराघरात पोहोचतोय. २७ जुलै, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वा. झी टॉकीजवर या सिनेमाचे टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. “हा सिनेमा नाही… ही आठवण आहे. आणि ती कायम माझ्या हृदयात राहील,” असं सिद्धार्थ या सिनेमाबद्दल म्हणाला.