गेले काही दिवस मराठी चित्रपटसृष्टीत ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाची खूप चर्चा आहे. चार दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या हटके नावामुळे या चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तर आता या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकताच आस्ताद काळेने हा चित्रपट पाहिला आणि त्याबद्दल त्याने एक पोस्ट लिहिली आहे.
परेश मोकाशी यांनी ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातून अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगण्यात आली आहे. आस्ताद काळेने नुकताच हा चित्रपट पाहिला आणि तो चित्रपट त्याला कसा वाटला आहे त्याने एक पोस्ट लिहित सांगितलं आहे.
आस्तादने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्या पोस्ट मधून त्याने ‘आत्मपॅम्फ्लेट’ प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलं, “आत्मपॅम्फ्लेट…मी काही कोणी मोठा नाही. पण तरीही सांगतो. हा चित्रपट बघायलाच हवा याची काही ठोस कारणं(माझ्या मते):-
1) उत्कृष्ट कथाकथन.
2) उत्कृष्ट लिखाण.
3) उत्कृष्ट विषय.
4) त्या विषयाची उत्कृष्ट हाताळणी.
5) उत्कृष्ट कामं(लेखकापासून रंगभूषाकारापर्यंत, दिग्दर्शकापासून spot दादांपर्यंत).
6) आपल्याला आंतरमुख करून, प्रश्न पाडून विचार करायला लावण्याचा एक उत्कृष्टरित्या यशस्वी प्रयत्न.”
पुढे त्याने लिहिलं, “गेल्या काही वर्षांत मी स्वत: केवळ ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांमधेच कामं केली आहेत. त्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी फार फार उत्तम प्रतिसाद दिला. विशेषत: तरूण प्रेक्षकवर्गानी. आपण इतिहासात पटकन रमतो. त्यातून तो छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल तर समस्त महाराष्ट्र अभिमानानी आणि प्रेमानी या ‘आपल्या राजा’साठी भान हरपून बसतो. ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा इतिहासपट नाही. किंवा साधारण 1980-1990मधे जन्मलेल्यांचा ‘इतिहास’ सांगणारा चित्रपट वाटूही शकतो. हे ज्यानी-त्यानी ठरवावं. अर्थात चित्रपट THEATREमधे पाहूनच.”

शेवटी त्याने लिहिलं, “मला ही माझी गोष्ट वाटली. तुम्हालाही वाटू शकेल. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘देउळ’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘धुराळा’, हे CINEMA म्हणून मला PATH-BREAKING, किंवा PATH-SETTING वाटले. ‘आत्मपॅम्फ्लेट’ या यादीत नक्कीच जाऊन बसतो. नक्की बघा. THEATREमधेच बघा. ता.क:- तुमच्या भागात हा चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्यास कृपया सांगा.” तर आता त्याने दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.