गेले काही दिवस राज्यभरात मराठी-हिंदी भाषेबद्दल वातावरण चांगलंच तापलं आहे. सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात अनेक राजकीय पक्ष एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोमवारी (७ जुलै) रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात साहित्यिक आणि सामाजिक व राजकीय पक्ष एकत्र आले होते. यावेळी अभिनेता सुमित राघवनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाला होता.
यावेळी अभिनेत्याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मराठी शाळा आणि शिक्षकांचा मुद्दा मांडला. अशातच आता मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा हा मुद्दा उपस्थित केला आहे. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे मुंबईतील मराठी शाळा व शिक्षक कसे बाहेर फेकले गेले याबद्दल त्यांचं मत मांडलं आहे. तसेच त्यांनी अमराठी बिल्डर्सबद्दलही ठाम भूमिका स्पष्ट केली.
या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे असं म्हणतात, “गेल्या काही दिवसांपासून मराठी हिंदी भाषेवरून जो गदारोळ सुरू आहे. त्यात मराठीच्या, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी सगळे राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ही एक खूप चांगली गोष्ट आहे की, यात कोणता राजकीय झेंडा नाही. या गोष्टीला मी माझा पाठिंबा दर्शविला आहे. सोशल मीडियावर मी माझी पोस्ट शेअर केली आहे.”
पुढे त्यांनी म्हटलं, “पण माझ्या डोक्यात कधी कधी विचार येतात की, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पक्षाच्या हातातच या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता होती. मग महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत जे अमराठी लोक घुसले आहेत आणि जे जे मुख्य मराठी माणसांचे बालेकिल्ले होते, जिथे आमच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भायखळा, लालबाग, परळ, दादर, माहीम, गिरगाव हे मराठी माणसांचे परिसरात शिवसेना रुजवली, त्या सगळ्या ठिकाणाहून मराठी माणसं गायब कसे झाले.”
त्यानंतर शरद पोंक्षे म्हणतात, “बिल्डरांची जी लॉबी आली, ज्यात ९० टक्के अमराठी बिल्डर्स घुसले. या बिल्डर्सना ज्या परवानग्या दिल्या गेल्या आणि तेव्हा महापलिकेवर ज्यांची सत्ता होती, त्यांनी यांना अशी अट का घातली नाही, की तुम्ही एखादी चाळ पाडून टॉवर बांधणार असाल, तर त्यात मराठी कुटुंबांना सगळे फ्लॅट दिलेच पाहिजेत. किंवा फक्त मराठी बिल्डर्सनाच आम्ही पुनर्बांधणीसाठी देऊ, असा नियम का लावला नाही? तेव्हा सगळे एकत्र रस्त्यावर का नाही उतरले.”
“एसएससी बोर्ड संपला आणि सीबीएससी बोर्ड आला, याबद्दल नेते रस्त्यावर का नाही उतरले?”
पुढे त्यांनी असं म्हटलं, “महाराष्ट्रातील, मुंबईतील सगळ्या मराठी शाळा प्रचंड वेगाने कमी होत गेल्या आणि इंग्रजी शाळांचं एक जंगल उभं राहिलं. डोळ्यांसमोर मराठी शाळांची संख्या कमी झाल्या, त्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली. आमचा एसएससी बोर्ड संपला आणि तिथे सीबीएससी बोर्ड निर्माण झाला. याबद्दल कधी कोणते नेते रस्त्यावर का नाही उतरले? शाळा संपली, मराठी भाषा संपायला निघाली. मराठी शाळांमधील दुरवस्था, शिक्षकांची दुरवस्था, अशी व्यवस्था का झाली?”
“आता मराठी भाषेवर अन्याय होत आहे; म्हणून जे एकत्र आले तसे याआधी का आले नाही?”
पुढे शरद पोंक्षे यांनी असं म्हटलं, “आता जे होत आहे, ते चुकीचं नाही. ते व्हायलाच पाहिजेत. गेल्या २५-३० वर्षांत मराठी माणसं, मराठी शाळा कमी होत आहेत. अमराठी लोकांची दादागिरी वाढत चालली आहे. राजसाहेब ठाकरे बऱ्यापैकी आंदोलन करीत असतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक. पण आता मराठी भाषेवर अन्याय होत आहे. म्हणून जे एकत्र आले, तसे याआधी का आले नाही? यापुढे असं कधी कोणाला वाटेल का? अशी आशा करू…”
“कोणीतरी अमराठी लोक येऊन दादागिरी करतील अशी परिस्थितीच येता कामा नये”
त्यानंतर ते म्हणतात, “मराठी माणूस मुख्य शहरांतून बाहेर जाऊ नये. इकडे त्यांचंच राज्य असावं. या शहरांचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार बहुसंख्य मराठी लोकांच्या हातात असावा. त्यांच्यावर कोणीतरी अमराठी लोक येऊन दादागिरी करतील, अशी परिस्थितीच येता कामा नये. मराठी लोकांना बाहेर हाकलणाऱ्या अमराठी बिल्डर्स लॉबीबद्दल कधी कोणी झेंडे आणि पक्ष सोडून रस्त्यावर उतरेल का? मराठी शाळांसाठी कधी कोणी एकत्र येईल का? अशी आशा करूयात. कारण- आपण शेवटी आशेवरच जगत असतो. सगळं चांगलं होणार आहे.”