रेणुका शहाणे आता लवकरच ‘उत्तर’ या मराठी सिनेमात झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा लोकप्रिय अभिनेता अभिनय बेर्डेसह स्क्रीन शेअर केली आहे. माझ्या आयुष्यातील पहिला मराठी सिनेमा मी लक्ष्मीकांतबरोबर केला आणि आता अभिनयबरोबर काम करताना खूपच भरून आलं होतं, असं रेणुका शहाणेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सेटवर लक्ष्मीकांत बेर्डेंनी वेळोवेळी कशी मदत केली याशिवाय ‘हम आपके है कौन’ सिनेमाच्या सेटवर सुद्धा लक्ष्मीकांतने मला खूप सपोर्ट केला असंही त्यांनी सांगितलं.

रेणुका शहाणे ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “हम आपके है कौन’ या सिनेमाच्या आधी सुद्धा मी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम केलेलं आहे. मी माझा पहिला मराठी चित्रपट त्याच्याबरोबर केलाय. आम्ही दोघं एक भन्नाट जोडी आहोत असं त्याला वाटायचं. तो नेहमी बोलायचा, मी तुझ्याकडे बघतो तेव्हा मला तुझ्यात छोटी बहीणच दिसते. त्यामुळे पहिल्याच मराठी सिनेमाच्या सेटवर त्याने मला खूप सांभाळून घेतलं. कारण, मी पहिल्यांदाच कॉमेडी सिनेमात काम करत होते. हाच सुनबाईचा भाऊ असं त्या सिनेमाचं नाव होतं. तो पुरुषोत्तम बेर्डेंचा सिनेमा होता. बरं लक्ष्मीकांतचा कॉमिक टायमिंग…म्हणजे तेव्हा तो इतका लोकप्रिय होता. एकदम टॉपचा स्टार…त्यामुळे त्या सेटवर मी खूप बुजलेली होते.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “लक्ष्मीकांतने सेटवर मला खूपच कम्फर्टेबल केलं. मला आठवतंय, त्या सिनेमात माझं आणि लक्ष्मीकांतच एकत्र एक गाणं होतं. मी इतरांना डान्स करताना पाहू शकते, मला ते खूप आवडतं पण, मला स्वत:ला डान्स करायला फारसं आवडत नाही. तेव्हा सुबल सरकार आमचे नृत्यदिग्दर्शक होते. माझी आणि लक्ष्याची त्यात एक डान्स स्टेप होती आणि मी सारखी चुकत होते. त्यामुळे शेवटी सुबल दादांनी ओरडून मला सांगितलं. घरी सुद्धा एवढ्या मोठ्या आवाजात माझ्याशी कोणी बोललं नव्हतं. ते संपूर्ण युनिटच्या समोर मला ओरडत होते, प्रचंड रागात होते. ते सगळं पाहून मी रडायलाच लागले. त्यावेळी लक्ष्याने मला धीर दिला.”

“लक्ष्या मला म्हणाला, तसंही लाँग शॉट आहे…काही दिसत नाही. तू रड हवं तर…रडत-रडत नाच आणि खूप हातवारे कर. ती एनर्जी दिसूदेत. मी त्याला सांगितलं ठिक आहे करते. शेवटी तो टेक झाला आणि सुबल दादा मला म्हणाले, ‘देख इतना अच्छा किया…’ मग लक्ष्मीकांतने येऊन माझं कौतुक केलं. तो म्हणाला, अगं ज्या लोकांवर सुबल दादा रागावले आहेत त्या सगळ्या नायिका खूप मोठ्या हिरोईन झाल्या आहेत. त्यामुळे तुझं आताच अभिनंदन करतोय!” असं रेणुका शहाणेंनी सांगितलं.

रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या, “हम आपके है कौन’च्या सेटवर सुद्धा मला लक्ष्मीकांतने खूप सपोर्ट केला. रिमा ताईंना मी ओळखत होते पण, लक्ष्मीकांतबरोबर मी आधीच काम केलेलं होतं. त्यामुळे सेटवर त्याचा एक सपोर्ट मिळायचा. लक्ष्या आणि सलमान खूप जवळचे मित्र होते. तो नेहमी मला प्रत्येक गोष्टीत सामावून घ्यायचा. त्यामुळे आता अभिनयबरोबर काम करणं हे माझ्यासाठी खूप जास्त इमोशनल होतं. अभिनय इतका चांगला मुलगा आहे…मुळात तो अभिनेता म्हणून लक्ष्मीकांतपेक्षा खूप वेगळा आहे. लक्ष्मीकांतमध्ये एक वेगळंच टॅलेंट होतं, त्याची एक वेगळीच मॅजिक होती. अभिनयबद्दल सांगायचं झालं तर माणूस म्हणून तो खरंच खूपच चांगलाय…त्याची काम करण्याची पद्धतही वेगळी आहे. तो विचार करतो, ट्रायआऊट करतो…लक्ष्मीकांत आणि अभिनय या दोघांचीही काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे आणि अभिनय सुद्धा खूपच टॅलेंटेड आहे.”